नवी दिल्ली: हुकूमशाहीविरोधातील लोकशाहीचा लढा असल्याचा नारा देत रामलीला मैदानावर जमलेल्या ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. या दोघींना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीही ‘इंडिया’च्या सभेत रविवारी सामील झाल्या.
कल्पना सोरेन व सुनीता केजरीवाल पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील राजकीय सभेमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘लोकशाही बचाव’ सभेत सुनीता केजरीवाल यांनी भाषणामध्ये, पंतप्रधान मोदींची माझ्या पतीला तुरुंगात टाकण्याची कृती योग्य होती असे तुम्हाला वाटते का? केजरीवाल देशभक्त आणि इमानदार व्यक्ती आहेत की नाही? केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा का, असे प्रश्न विचारत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. केजरीवालांच्या पत्राचे त्यांनी जाहीर वाचन केले. केजरीवाल यांना सिंहाची उपमा देत सुनीता यांनी, ‘ईडी’ केजरीवालांना फार काळ तुरुंगात ठेवू शकणार नाही, असा आशावाद व्यक्त केला. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्या कल्पना सोरेन यांनी, ही हुकूमशाहीविरोधातील लढाई असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>> भाजप हाच ठगांचा पक्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
‘इंडिया’ची एकजूट
रामलीला मैदानाच्या परिसरात काँग्रेसचा हात, आपचा झाडू आणि डाव्यांचा कोयता असलेले झेंडे एकत्र फडकताना दिसत होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सीताराम येचुरी, डी. राजा, दीपंकर भट्टाचार्य, डेरेक ओब्रायन आदी नेते सभेला उपस्थित होते.
मैदानात खडे आणि म्हणे खेळा!
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधींच्या मॅचफिक्सिंगच्या आरोपाचा धागा पकडत मोदींविरोधात टीका केली. क्रिकेट खेळण्यासाठी सपाट मैदान तयार केले जाते. इथे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात मोदींनी सगळीकडे खड्डे करून ठेवले आहेत आणि आता ते आम्हाला लढा म्हणत आहेत, अशी उपहासात्मक टीका खरगेंनी केली. वकील तुमचा, न्यायालय तुमचे, पोलीसही तुमचे, सगळेच तुमचे आहे.
केंद्र सरकारची कृती लोकशाहीवर हल्ला- शरद पवार
केजरीवाल व सोरेन यांना ज्या पद्धतीने अटक केली गेली, वेगवेगळया राज्यांतील विरोधी नेत्यांना, खासदारांना, आमदारांना केंद्र सरकारने तुरुंगात टाकले ही कृती म्हणजे देशाच्या संविधान व लोकशाहीवर होत असलेला हल्ला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘इंडिया’च्या सभेत केला.
‘इंडिया’च्या सभेत ६ आश्वासने, ५ मागण्या
नवी दिल्ली : अटकेत असलेले ‘आप’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्राच्या माध्यमातून ‘इंडिया’च्या वतीने सहा आश्वासनांची घोषणा केली. सभेच्या अखेरीस काँग्रेसच्या वतीने पाच मागण्याही करण्यात आल्या. आश्वासने केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी तर, काँग्रेसच्या मागण्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी वाचून दाखवल्या.
सहा आश्वासने
देशात कुठेही विजेची कुमतरता भासणार नाही. देशभर गरिबांना वीज मोफत असेल. प्रत्येक खेडयात सरकारी शाळा असेल. प्रत्येक खेडयात मोहल्ला क्लिनिक असतील. प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालये असतील, तिथे प्रत्येकाला मोफत उपचार मिळतील. शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव दिला जाईल. गेली ७५ वर्षे दिल्लीकरांवर अन्याय झाला असून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.
पाच मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत सर्वांसाठी समान संधी सुनिश्चित केली पाहिजे. निवडणूक आयोगाने सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, आणि प्राप्तिकर विभाग आदींकडून विरोधी पक्षांविरोधात जबरदस्ती होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची तात्काळ सुटका करावी. विरोधी पक्षांची आर्थिक गळचेपी बंद करावी. निवडणूक रोखे, खंडणी आणि आर्थिक अनियमततांच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले जावे.