भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिच्या दोन सहकाऱ्यांसह सुखरूपपणे पृथ्वीवर परतली आहे. चार महिने पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहिल्यानंतर आज हे तिघे सोयूझ कॅप्सूलच्या मदतीने कझाकस्तानात उतरले. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकातील ३३व्या मोहिमेचे नेतृत्व सुनीताने केले होते. सुनीता विल्यम्स, उड्डाण अभियंता युरी मालेनचेन्को व अकी होशाइड हे भारतीय प्रमाणवेळेनुसार सात वाजून सव्वीस मिनिटांनी अरकालक शहरात अंधाऱ्या रात्री उतरले. नासाचे प्रवक्ते रॉब नॅव्हियस यांनी सांगितले, की सर्वजण सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. कॅप्सूलमधून बाहेर पडल्यानंतर सुनीता विल्यम्स, रशियाचा मालेनचेन्को व जपानचा होशाइड या तिघांनी स्मितहास्य केले. उड्डाणोत्तर चाचण्यांसाठी फुगवलेल्या तंबूत जाण्यापूर्वी ते जाड ब्लँकेटचे आच्छादन असलेल्या आसनांवर बसलेले होते. पृथ्वीवर उतरल्यानंतर या सर्वाची प्रकृती व्यवस्थित होती असे मोहीम नियंत्रण प्रवक्त्यांनी सांगितले.
सोयूझच्या अवतरणास विशिष्ट कारणास्तव काही सेकंद विलंब झाल्याने त्यांचे उतरण्याचे ठिकाण बदलावे लागले. सुनीता विल्यम्स, होशाइड व मालेनचेन्को हे तिघेही १२७ दिवसांची मोहीम आटोपून पृथ्वीवर परतले आहेत. त्यांनी १२५ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात वास्तव्य केले. कझाकस्तानातील बैकानूर अवकाशतळावरून १५ जुलैला ते अवकाशात गेले होते. सुनीता विल्यम्स हिने दोन मोहिमांत एकूण ३२२ दिवस अंतराळात वास्तव्य केले आहे. ९ डिसेंबर २००६, २२ जून २००७ असे दोनदा तिने अंतराळस्थानकात वास्तव्य केले आहे. नासाच्या पेगी व्हिटसन हिच्यानंतर अंतराळात सर्वाधिक वास्तव्य करणारी ती दुसरी महिला ठरली आहे. व्हिटसन हिने ३७७ दिवस अंतराळात वास्तव्य केले आहे. अंतराळात स्पेसवॉक करण्याचा विक्रम सुनीताच्या नावावर आहे. तिने ५० तास ४० मिनिटे स्पेसवॉक केले आहे. तिने अंतराळात सात वेळा स्पेसवॉक केले. अंतराळस्थानकातील मोहिमेचे नेतृत्व करणारी ती दुसरी महिला कमांडर ठरली आहे. या वेळी अंतराळात तिने ट्रायथलॉन पूर्ण केले. तीन स्पेसवॉक केले.
आज जेव्हा हे कॅप्सूल कझाकस्तानात अरकालक येथे उतरले त्या वेळी तिथे कडाक्याची थंडी होती. तिथे १२ अंश फॅरनहीट म्हणजे उणे ११ अंश सेल्सियस इतके तापमान होते. वाऱ्यामुळे ते उणे १७ अंश सेल्सियस वाटत होते. सोयूझ कॅप्सूल हे जमिनीवर येतााच एका पथकाने लगेच अंतराळवीरांना बाहेर काढून त्यांची पुढील व्यवस्था केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा