Sunita Williams Return To Earth NASA SpaceX Crew-9 : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज (१९ मार्च) पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेले विल्यम्स व विल्मोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले होते. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. नऊ महिने पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणापासून दूर राहिल्यामुळे त्या काही दिवस पृथ्वीवर आधाराशिवाय उभ्या देखील राहू शकणार नाहीत. त्यामुळे अवकाश यानातून त्यांना बाहेर काढल्यानंतर स्ट्रेचरवरून प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आलं.
नऊ महिने संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे शरीराची झालेली झिज भरून काढण्यासाठी त्या दोघांनाही ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावं लागणार आहे! क्रू-९ यानावरील कॅप्स्यूलमधून बाहेर काढल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना स्ट्रेचरवरून नेण्यात आल्याचं पाहून त्यांना नेमकं काय झालंय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्या आजारी नाहीत, तसेच त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. त्यांना सध्या उभं राहता येत नाहीये. त्यामुळेच त्यांना स्ट्रेचरवरून नेण्यात आलं.
पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांना स्ट्रेचरवरून नेण्याचा प्रोटोकॉल
लाइव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून नेण्याची प्रक्रिया आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील संशोधन मोहिमेशी संबंधित नाही. तो केवळ एक प्रोटोकॉल आहे. सर्व अंतराळवीरांना या प्रोटोकॉलचं पालन करावं लागतं. कारण कुठलाही अंतराळवीर काही दिवस अंतराळात राहून आल्यानंतर तो पृथ्वीवर चालू शकत नाही. त्याने उभं राहण्याचा, चालण्याचा प्रयत्न केल्यास तो धडपडू शकतो, त्याला इजा होऊ शकते. त्यामुळे हा नियम बनवण्यात आला आहे.
शरिराची झिज भरून काढण्याचं आव्हान
अंतराळवीर पृथ्वीवर आल्यानंतर त्यांचं डोकं गरगरू शकतं, त्यांना भोवळ येऊ शकते. त्यांचे स्नायू इथल्या गुरुत्त्वाकवर्षण शक्तीसमोर निष्प्रभ ठरतात. त्यामुळे शारिरीक हालचाली करताना त्रास होतो. म्हणूनच अंतराळवीरांना स्ट्रेचरवरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेलं जातं. त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातात. अंतराळात असताना शरिराची झालेली झिज भरून काढल्यानंतर त्यांना सामान्य हालचाली करणं शक्य होतं.
दोघांनाही ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावं लागणार!
सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे पृथ्वीवर जरी परतले असले, तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. शरीराची झालेली झिज भरून काढणे, त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने आणि आता पृथ्वीवर परतल्यानंतर आसपासच्या बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी या काळात दोघांना नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल. दोघांनाही ४५ दिवसांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये राहावं लागणार!