Sunita Williams Space Mission Body Effects: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर हे अखेर पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले. तब्बल २८६ दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. पण असं असलं, तरी या काळात संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावं लागणार आहे!

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पृथ्वीवर परतले, पण ४५ दिवस थांबावं लागले!

सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे पृथ्वीवर जरी परतले असले, तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.

काय आहे हा ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’?

साधारणपणे ४५ दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’ अंतर्गत दिवसाचे दोन तास, असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण ४५ दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत. या काळामध्ये या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया यासंदर्भात सामान्य परिस्थितीत येण्यासाठी मदत केली जाईल.

या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’चे साधारणपणे तीन टप्पे असतील. सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर आधारित या प्रत्येक टप्प्यातील बाबी या दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ठरवल्या जातील.

पहिला टप्पा – या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना चालणे-फिरणे, शारिरीक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे यासंदर्भात उपचार दिले जातील.

दुसरा टप्पा – या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव, त्यानुसार शारिरीक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल, शरीराची जाणीव, आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश होतो.

तिसरा टप्पा – हा या कार्यक्रमाचा सर्वात अधिक काळ चालणारा टप्पा असेल. या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या शारिरीक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.

सुनीता विल्यम्स यांच्यानावे ‘स्पेसवॉक’ विक्रम!

सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांनी त्यांच्या २८६ दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात एकूण १२ कोटी १३ लाख ४७ हजार ४९१ मैल प्रवास केला. पृथ्वीभोवती ४ हजार ५७६ फेऱ्या मारल्या. या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांनी सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला ठरल्याचा विक्रम नावावर केला आहे. सुनीता विल्यम्स यांनी या मोहिमेत एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक केला आहे. एकूण सर्वाधिक काळ स्पेसवॉक केलेल्या अंतराळवीरांच्या यादीत त्या चौथ्या स्थानी आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita williams butch wilmore return on earth will undergo 45 days rehabilitation programm main disc news pmw