Sunita Williams Butch Wilmore : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच बिल्मोर हे दोघे नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. परतल्यानंतर दोघांनी एकत्र पहिली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीवेळी त्यांनी त्यांची अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकेले असताना आलेले अनुभव, अडचणी व परतीच्या प्रवासाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. बोइंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याने विल्यम्स व विल्मोर तब्बल २८६ दिवस आयएसएसमध्येच अडकून राहिले होते.
उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी क्रू ड्रॅगन हे अवकाशयान पाठवलं. दोन्ही अंतराळवीर या यानाने सुरक्षित पृथ्वीवर परतले. दोन्ही अंतराळवीर केवळ आठ दिवसांच्या संशोधन मोहिमेवर गेले होते. मात्र, त्यांचं बोइंग स्टारलायनर यान बिघडल्याने त्यांना तब्बल नऊ महिने अंतराळात राहावं लागलं. दरम्यान, एका मुलाखतीवेळी या अंतराळवीरांना प्रश्न विचारण्यात आला की मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या अपयशासाठी तुम्ही कोणाला जबाबदार धरता? यावर बुच विल्मोर यांनी स्वतःसह मोहिमेत सहभागी सर्वांनाच दोषी ठरवलं. बोइंगने फसवणूक केल्याचा दावा दोन्ही अंतराळवीरांनी फेटाळला.
बुच विल्मोर म्हणाले, “क्रू फ्लाइट टेस्ट कमांडर म्हणून मी काही प्रश्न विचारले नाहीत. त्यामुळे मी दोषी आहे आणि मी देशासमोर माझी चूक कबूल करतो.” विल्मोर यांच्या मते उड्डाण करण्याआधी काही प्रश्न त्यांनी मोहिमेचं आयोजन करणाऱ्यांना विचारायला हवे होते, जे त्यांनी विचारले नाहीत. ते म्हणाले, “आता मी मागे वळून पाहतो तेव्हा मला काही गोष्टींचे संकेत नक्कीच मिळतात.” यावर विल्मोर यांना नासा व बोइंगच्या जबाबदारीबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “यामध्ये सर्वांचंच योगदान आहे. ही मोहीम आम्ही आखलेल्या योजनेनुसार पार पडली नाही. टेस्ट व तयारीबाबत काही मुद्दे होते, जे मला उड्डाण करण्यापूर्वी माहिती नव्हते. मी देखील त्याबाबत प्रश्न उपस्थित केले नाहीत.”
ISS मध्ये नऊ महिने कसे घालवले?
सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकून पडले होते. विल्यम्स यांनी हे नऊ महिने म्हणजे अमूल्य अशी वैज्ञानिक संधी होती असं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “या काळात आम्ही तिथे अनेक महत्त्वाचे प्रयोग केले. यावेळी भविष्यातील योजनांबद्दल विचारल्यानंतर सुनीता विल्यम्स म्हणाल्या, मी पुन्हा एकदा अंतराळात जायला तयार आहे. तत्पूर्वी बोइंग व नासाच्या या मोहिमेची समीक्षा करायला हवी.”
नेमकी चूक कोणाची?
दोन्ही अंतराळवीरा अंतराळात अडकल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सोडून दिले होते, दोघांनाही अडकवण्यात आलं होतं, असे काही दावे केले जात आहेत. तसेच यामध्ये नासाची चूक होती की बोइंगची? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. यावर विल्मोर व विल्यम्स यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “ठीक आहे, काही गोष्टींचं नियोजन करण्यात आम्ही (नासा) चुकलो. त्यामुळेच आम्ही आयएएसमध्ये अडकून पडलो. आम्ही आमच्या योजनेनुसार पृथ्वीवर परतू शकलो नाही. मात्र, आम्ही अशा अडचणींसाठी प्रशिक्षित आहोत.”