Sunita Williams Family Connection with India : नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघे बुधवार (१९ मार्च) रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. त्यांना घेऊन आलेले नासाचे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनार्‍यावर यशस्वीपणे उतरले. अवघ्या आठ दिवसांसाठी गेलेल्या या दोघांना जवळपास नऊ महिने अंतराळातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर राहावे लागले. दरम्यान दोघे सुखरूप परतल्याबद्दल जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

ही मोहिम सुरुवातीला बोईंग स्टारलायनर स्पेसक्राफ्टच्या चाचणीसाठी नियोजित होती, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हे यान परतीच्या प्रवासासाठी योग्य नसल्याचे समोर आले. ज्यामुळे अंतराळवीरांना जास्त दिवस आयएसएसवर राहावे लागल्याने या मोहिमेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्स यांच्या भारताशी असलेल्या कनेक्शनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

सुनीता विल्यम्स यांचे भारताशी नाते

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पंड्या हे मूळचे गुजरातमधील झुलासन येथील आहेत. १९५३ मध्ये गुजरात विद्यापीठातून इंटरमीडिएट सायन्स (आयएस) पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १९५७ मध्ये एमडी पदवी मिळवली आणि पुढील वैद्यकीय प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले.

त्यांनी १९६४ मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शरीररचनाशास्त्र विभागात पोसडॉक्टरल फेलो म्हणून काम केले. पुढे त्यांनी देशातील अनेक रुग्णालये आणि संशोधन संस्थांमध्ये काम केले. १९५७ मध्ये अमेरिकेत आल्यानंतर पंड्या यांची स्लोव्हेनियन-अमेरिकन उर्सुलिन बोनी झालोकर यांच्याशी भेट झाली आणि पुढे दोघांनी लग्न केले.

सुनीता विल्यम्स यांनी मायकल जे. विल्यम्स यांच्याशी लग्न केले असून ते टेक्सस येथे फेडरल मार्शल आहेत. आपआपल्या क्षेत्रातील करियरमध्ये पुढे जाण्यापूर्वी दोघांना हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव राहिला आहे. दरम्यान या दोघांच्या लग्नाला २० वर्ष झाली आहेत आणि त्यांना कोणतेही अपत्य नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलला दिलल्या मुलाखतीत मायकल विल्यम्स यांनी सुनीता यांच्यासाठी अंतराळ हे ‘हॅप्पी प्लेस’ असल्याचे म्हटले होते.

सुनीता विल्यम्स यांचे शिक्षण

माजी यूएस नेव्ही कॅप्टन आणि नासा अंतराळवीर असलेल्या सुनीता विल्यम्स (५९) यांना लहानपणापासून विज्ञानाची गोडी होती. सुनीता विल्यम्स यांचं लहानपणी जनावरांचा डॉक्टर होण्याचे स्वप्न होतं, मात्र त्यांनी त्यांच्या भावाने प्रवेश घेतला होता त्या यूएस नेव्हल अकादमीला भेट दिली आणि त्यांनी नेव्हल ऑफिसर बनण्याचा निर्णय घेतला.

१९९८ मध्ये नासाच्या अंतराळवीर म्हणून निवड झाल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS)साठी रशियाने दिलेल्या योगदानाच्या वेळी विल्यम्स यांनी मॉस्कोमधील रशियन स्पेस एजन्सी बरोबर देखील काम केले.

सुनीता विल्यम्स या ९ डिसेंबर २००६ रोजी पहिल्यांदा अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. स्पेस शटल डिस्कव्हरीच्या माध्यमातून अंतराळात गेलेल्या विल्यम्स या आयएसएस एक्सपिडिशन १४ आणि १५ दरम्यान १९५ दिवस ऑरबिटमध्ये राहिल्या. त्यानंतर रशियाच्या सोयुझ (Soyuz) स्पेसक्राफ्टमधून चार महिन्याच्या मोहिमेसाठी १७ जुलै २०१० रोजी विल्यम्स या पुन्हा आयएसएसवर परतल्या. ही मोहिम संपवून त्या १९ नोव्हेंबर २०१२ रोजी पुन्हा पृथ्वीवर परतल्या.

सुनीता विल्यम्स यांनी १६ एप्रिल २००७ रोजी आयएसएसवर ४ तास २४ मिनिटांत बॉस्टन मॅरेथॉन पूर्ण केली होती, याबरोबरच अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती बनल्या. तर २०१२ च्या मोहिमेदरम्यान आयएसएसचे नेतृत्व कारणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या. सुनीता विल्यम्स या अनेक वेळा भारतात आल्या आहेत. २००७ आणि २०१३ मध्ये त्यांच्या अंतराळातील मोहिमेनंतर त्या भारतात आल्या होत्या. २००८ मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक ‘पद्म भूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सुनीता विल्यम्स यांच्या गावात आरती आणि प्रार्थना

दरम्यान, बुधवारी पहाटे सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर, निक हेग व अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. यानंतर विल्यम्स यांच्या गावी मोठा जल्लोष करण्यात आला. त्यांच्या परतीनंतर झुलासन गावात आरती आणि प्रार्थना करण्यात आल्या. गावची लेक सुरक्षित परतल्याबद्दल इश्वराचे आभार मानण्यात आले. त्याचबरोबर आसपासच्या गावातही लोकांनी जल्लोष केला. मेहसाणामध्ये नागरिकांनी आनंद साजरा केला.

Story img Loader