Sunita Williams first Video after she returns to Earth after 286 days : अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आल्या आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातात उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळात गेले होते. मात्र बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) येथे घालवावे लागले. दरम्यान दीर्घ काळ अंतराळात घालवल्यानंतर जेव्हा सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर उतरल्या तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

सुनीता विल्यम्स (५९) या त्यांचे सहकारी बुच विल्मोर, निक हेग आणि अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्यासह स्पेसएक्स क्रू ९ ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांचे स्पेस कॅप्सूल फ्लोरिडाच्या तल्लाहास्सी येथे मेक्सिकोच्या आखातात सुरक्षितपणे उतरले. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स ३९ए (एलसी-३९ए) वरून फाल्कन ९ यानाने ड्रॅगन स्पेसक्राफ्ट लाँच केले होते, ज्यामधून हेग आणि गोर्बुनोव्ह हे स्पेस स्टेशनवर गेले होते अशी माहिती स्पेसएक्सने दिली आहे.

नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना जेव्हा ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर हसू पाहायला मिळाले. कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर विल्यम्स यांनी हसून कॅमेऱ्याकडे पाहत हात हलवला.

अंतराळवीरांना घेऊन येणाऱ्या बोईंग स्टारलायनर या यानात काही तांत्रिक अडचणी आल्याने नासाला त्यांची योजना बदलावी लागली होती. ५ जून २०२४ रोजी बोईंग स्टारलायनरच्या माध्यमातून विल्यम्स आणि विल्मोर हे अंतराळात गेले होते. त्यांची ही मोहिम अवघ्या आठ दिवसांसाठी नियोजित होती मात्र त्यांना २८६ दिवस अंतराळात राहावे लागले.

आता पुढे काय?

दरम्यान इतके दिवस अंतराळात राहिल्याने सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावं लागणार आहे. त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.

Story img Loader