NASA Space X Crew-9 Return Updates : नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर आज ते पृथ्वीतलावर पोहोचले. एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सने केलेल्या कामगिरीने ते सुखरुपपणे पृथ्वीतलावर उतरले. आठ दिवसांची मोहिम तब्बल ९ महिने लांबल्याने सुनीता विल्यम्स यांच्या परतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे त्यांचं कॅप्सुल फ्लोरिडाच्या समुद्रात उतरातच जगभरातून आनंद व्यक्त केला गेला. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्यासाठी तर भारतात यज्ञ करण्यात आला होता. त्यांच्या परतीसाठी भारतीयांनीही प्रार्थना केली होती. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं स्वागत केलं आहे.
विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली. स्पेसएक्सच्या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलं. म्हणून त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “क्रू ९ तुमचं स्वागत आहे. पृथ्वीने तुमची खूप आठवण काढली. त्यांच्यासाठी (सुनीता आणि बुच) ही धैर्याची, धाडसाची आणि अमर्याद मानवी आत्म्याची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि Crew9 अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय असतो. विशाल अवकाशासमोर त्यांचा अढळ दृढनिश्चय लाखो लोकांना कायम प्रेरणा देईल.”
“अवकाश संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. एक अग्रणी आणि आयकॉन असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी संपूर्ण कारकिर्दीत या आत्म्याचे उदाहरण निर्माण केले”, असं म्हणत मोदींनी सुनीता विल्यम्स यांच्या चिकाटीचं कौतुक केलं.
Welcome back, #Crew9! The Earth missed you.
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2025
Theirs has been a test of grit, courage and the boundless human spirit. Sunita Williams and the #Crew9 astronauts have once again shown us what perseverance truly means. Their unwavering determination in the face of the vast unknown… pic.twitter.com/FkgagekJ7C
“सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा अचूकता उत्कटतेला आणि तंत्रज्ञान दृढतेला मिळते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे”, असंही मोदी म्हणाले.
दरम्यान, सुनीता विल्यम्स यांचा काल परतीचा प्रवास झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतभेटीसाठी पत्र लिहिले होते. “तुमची प्रेरणादायी जिद्द आणि परिश्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर आम्ही तुमचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. यजमानपद भूषवणं ही भारतासाठी अभिमानाची बाब असेल. तुम्हाला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा”, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्सवर शेअर केलेल्या पत्रात नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे.