Sunita Williams NASA : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे गेल्या तीन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. नासासह अमेरिकाही त्या दोघांच्या पृथ्वीवर येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप नासाला यामध्ये यश आलेलं नाही. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अंतराळ स्थानकात गेलेलं बोईंगचं स्टारलाइनर त्या दोघांशिवाय पृथ्वीवर परतलं असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नासाच्या माहितीनुसार, बोईंगचे स्टारलाइनर यान आज (७ सप्टेंबर) न्यू मेक्सिकोच्या व्हाईट सँड्स सँड स्पेस हार्बरवर लँड झालं आहे. मात्र, हे यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्याशिवाय पृथ्वीवर परतलं आहे. त्यामुळे आता अजून पुढील काही महिने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन्ही अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरच राहावं लागणार आहे. या ‘स्टारलायनर’ने आज सकाळी ९.१५ वाजता दरम्यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर ताशी २,७३५ किमी इतका वेग होता. लँडिंगच्या ३ मिनिटांच्या आधी अंतराळ यानाचे २ पॅराशूट उघडले त्यानंतर यान पृथ्वीवर सुरक्षित उतरलं.

हेही वाचा : Manipur Drone Attack : मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

दरम्यान, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ५ जून रोजी ८ दिवसांच्या मिशनसाठी अंतराळात गेले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे आता त्यांना पुढील काही महिने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर राहावं लागणार आहे. तांत्रिक समस्यांमुळे बोइंगचे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परतलं आहे. तेसच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर आणलं जाण्याची शक्यता आहे. खरं तर ८ दिवसांत हे पुन्हा पृथ्वीवर येणार होते. मात्र, यानाचे थ्रस्टर निकामी झाल्याने आणि हेलियम गळतीमुळे त्यांचा अंतराळ स्थानकावरील मुक्काम वाढला. त्यानंतर नासाने निर्णय घेतला की स्टारलाइनरमधून त्या दोघांना परत आणणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आता फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्स त्यांना आणण्याची शक्यता आहे.

अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार?

दरम्यान, कमर्शियल क्रू प्रोग्रामचे संचालक स्टीव्ह स्टिच यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांना परत आणण्यासाठी आम्ही इतर काही पर्यायांचा विचार करत आहोत. सध्या आम्ही जी योजना आखली आहे, त्यानुसार दोन्ही अंतराळवीर २०२५ च्या सुरुवातीला पृथ्वीवर परततील. या योजनेत आम्ही स्पेसएक्स या कंपनीलाही सहभागी करून घेतलं आहे. नासाने मिशन क्रू ९ हे हाती घेतलं आहे. या मोहिमेंतर्गत नासाचं अवकाशयान अवाकाशात झेपावणार आहे. याच अवकाशयानाद्वारे दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणता येईल. याद्वारे २०२५ पर्यंत दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita williams nasa boeings starliner returns to earth without astronauts and when will sunita williams and barry wilmore return gkt