Sunita Williams Return Mission by NASA: आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) गेल्या जवळपास ९ महिन्यांपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या नासातील अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. फक्त ८ दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या मोहिमेवर गेले होते. पण त्यांना परत आणण्याची जबाबदारी असणाऱ्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघे गेल्या ९ महिन्यांपासून तिथेच अडकले आहेत.
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नासा व स्पेसएक्सतर्फे १३ मार्च २०२५ रोजी मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेची सर्व तयारीही झाली होती. १३ मार्च अर्थात गुरुवारी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी NASA SpaceX Crew-10 Mission च्या Falcon 9 रॉकेटचं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना परत आणण्याच्या मोहिमेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.
कधी होणार प्रक्षेपण?
फाल्कन रॉकेट लाँचसाठी आवश्यक असणारं हवामान नसल्यामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. रॉकेटच्या मार्गात पाऊस आणि वेगवान वारे असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण आता शुक्रवारी म्हणजेच १४ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी केलं जाणार आहे. नासाच्या रॉकेट लाँच कॅम्पस ३९ए या ठिकाणाहून हे प्रक्षेपण होईल.
डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांचा आग्रह
नुकतीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्यासह सुनीला विल्यम्स व बुच विलमोर यांना लवकरात लवकर पृथ्वीवर परत आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्याचाच एक भाग म्हणून नासाची ही मोहीम ठरलेल्या नियोजनापेक्षा दोन आठवडे आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नासाकडून तांत्रिक बिघाडावर काम सुरू
दरम्यान, नासाच्या लाँचिंग टीममधील क्रू मेंबर्सकडून लाँचिक सामग्रीतील हायड्रॉलिक यंत्रणेतील बिघाडावर काम सुरू करण्यात आलं आहे. Falcon 9 रॉकेटच्या ग्राऊंड सपोर्ट क्लॅम्प आर्ममधील हायड्रॉलिक यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. नासाच्या Launch Complex 39A परिसरात हे काम चालू आहे.