NASA Space X Crew-9 Return Updates: नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विलमोर तब्बल २८६ दिवसांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या ८ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना तांत्रिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच राहावं लागलं. मात्र, अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे त्यांना पृथ्वीवर परत आणणारी SpeceX Crew Dragon Capsule अमेरिकन सागरात उतरली आणि नासाच्या संपूर्ण टीमसह अवघ्या जगानं सुटकेचा निश्वास टाकला. सुनीता विल्यम्स यांच्या भारतातील गावानं लेकीच्या परतीचा जल्लोष केला!
गुजरातच्या झुलासन गावात सुनीता विल्यम्स यांचे कुटुंबीय राहतात. त्या अंतराळात अडकल्यानंतर या गावात त्यांच्या नातेवाईकांप्रमाणेच अवघ्या गावात चिंता पसरली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार असल्याचं नासाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर या गावानं सुटकेचा निश्वास टाकला. पण अजूनही चिंता संपली नव्हती. त्या सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्यासाठी गावकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रार्थना सुरू केली होती.
सुनीता विल्यम्स यांच्या भावानं केला यज्ञ
अंतराळातून सुनीता विल्यम्स सुरक्षितपणे परताव्यात यासाठी गुजरातमधील त्यांचे चुलत भाऊ दिनेश रावल यांनी यज्ञ केला होता. “सुनीता विल्यम्स घरी परतत असल्याने तिची आई, भाऊ आणि बहिण सर्व आनंदी आहे. आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी असून तिच्या परत येण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. कधी कधी भीती वाटते की काही गडबड होऊ नये. आम्ही आमच्या गावी देवीची प्रार्थना सुरू केली आहे. वरदाई देवीला हजारो किलो तूप दिलेलं आहे. महादर्शन केलं. गावातील मंदिरात जाऊन आलो. रघुनाथ स्कूल येथे शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर यज्ञ ठेवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, की ती एक अशी मुलगी आहे जिला जगभरात कसलीच भीती वाटली नाही. आज मला वाटतं की आमच्यासाठी सोनेरी दिवस आहे”, अशी प्रतिक्रिया सुनीता विल्यम्स यांच्या भावाने दिली होती.
सुनीता विल्यम्स यांच्या गावात आरती आणि प्रार्थना
दरम्यान, बुधवारी पहाटे सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विलमोर, निक हेग व अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. यानंतर विल्यम्स यांच्या गावी मोठा जल्लोष करण्यात आला. त्यांच्या परतीनंतर झुलासन गावात आरती आणि प्रार्थना करण्यात आल्या. गावची लेक सुरक्षित परतल्याबद्दल इश्वराचे आभार मानण्यात आले. त्याचबरोबर आसपासच्या गावातही लोकांनी जल्लोष केला. मेहसाणामध्ये नागरिकांनी आनंद साजरा केला.
पृथ्वीवर परतले, पण ४५ दिवस थांबावं लागले!
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे पृथ्वीवर जरी परतले असले, तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.