वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या परतीचा मुहूर्त अखेर ठरला असून ते भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर परत येतील. सुरुवातीला दोघेही बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते. मात्र ‘स्पेस एक्स’बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज, मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ने जाहीर केले.
●रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १०व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली.
●‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
●भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता ‘स्पेस एक्स ड्रॅगन क्रू’ या अंतराळयानाचे ‘हॅच’ बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या क्षणापासून ‘नासा’च्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
●‘नासा’चे अंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’चे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील सुनीता आणि बुच यांच्यासह परतीचा प्रवास करणार आहेत.
●वातावरणाने साथ दिल्यास उद्या, बुधवारी पहाटे ३.२७ वाजता सुनीता आणि बुच यांना घेऊन येणारी ‘स्पेस कॅप्सूल’ फ्लोरिडा किनाऱ्यापासून जवळ समुद्रात उतरेल.