Sunita Williams Return to Earth Mission by NASA & SpaceX : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी, आंतरराष्ट्रीय आंतराळ केंद्र म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (ISS) गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता नऊ महिने उलटून गेले आहेत, अद्याप ते परत आलेले नहीत. त्यांच्या अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विल्यम्स व विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था नासा आंतराळ संशोधन करणाऱ्या इतर काही खासगी कंपन्यांबरोबर मिळून हे प्रयत्न करत आहे.सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर हे दोघे अवघ्या ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र, आता ते नऊ महिन्यांपासून ते तिथेच अडकून पडले आहेत. विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी असणाऱ्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघे नऊ महिन्यांपासून तिथेच अडकले आहेत.

विल्यम्स व विल्मोर १९ मार्चपूर्वी पृथ्वीवर येऊ शकणार नाहीत

अलीकडेच नासाने स्पेसएक्स या कंपनीबरोबर मिळून या दोघांना परत आणण्यासाठी एक मोहीम हाती घेतली होती. १९ मार्चपर्यंत दोघे पृथ्वीवर येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र ही मोहीम पुढे ढकलावी लागली आहे. परिणामी विल्यम्स व विल्मोर १९ मार्चपूर्वी पृथ्वीवर येऊ शकणार नाहीत.

सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा व स्पेसएक्सतर्फे १३ मार्च २०२५ रोजी मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेची सगळी तयारी देखील झाली होती. १३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी नासाचं यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र, NASA SpaceX Crew-10 Mission च्या Falcon 9 रॉकेटचं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं. काही तांत्रिक अडथळ्यांमुळे यान पाठवण्यात आलं नाही. त्यामुळे सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांची आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पाऊस व वेगवान वाऱ्याचा अडथळा

फाल्कॉन ९ च्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असणारं हवामान नसल्यामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे. या रॉकेटच्या मार्गात पाऊस व वेगवान वाऱ्यांनी अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण शुक्रवारी (१४ मार्च) रोजी संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी लाँच केलं जाईल. नासाच्या रॉकेट लाँच कॅम्पस ३९ए या ठिकाणाहून हे प्रक्षेपण होईल. त्यानंतर १९ मार्च रोजी तेच यान विल्यम्स व विल्मोर यांना घेऊन पृथ्वीच्या दिशेने येईल.