Sunny Leone name beneficiary of Chhattisgarh govt scheme mahtari vandan yojana : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यामागचे कारण तिचा एखादा नवीन चित्रपट नाही तर ती चर्चेत आली आहे ती एका सरकारी योजनेचा लाभ घेतल्याने. छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजना’ (Mahatari Vandan Yojana) या योजनेची लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावावर पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर या संपूर्ण प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
कथितरित्या छत्तिसगड येथे सनी लिओनीच्या नावाने एक ऑनलाईन खाते उघडण्यात आले होते, ज्यामध्ये विवाहित महिलांना महतरी वंदन या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे १००० रुपये पाठवले जात होते. या योजनेची घोषणा राज्यातील सत्ताधारी भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती. दरम्यान आता बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.
महतरी योजनेच्या वेबसाईटवर तपासणी केली असता संबंधीत फाइलमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव सनी लिओन आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरमधील अंगणवाडी स्तरावर हा अर्ज करण्यात आला होता. तसेच या फाइलमध्ये अंगणवाडी करून आणि दुसऱ्या एका सुपरवायजर कडून याची सत्यता तपासण्यात आल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. कलते यामध्ये संबंधित लाभार्थ्याला मार्च आणि डिसेंबरचा हप्ता मिळाल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
जेव्हा बस्तरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत असं उत्तर त्यांनी दिले. बस्तर येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की जिल्हा प्रशासनाकडून जर काही तक्रार देण्यात आली तर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.
हेही वाचा>> अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
सरकारने राज्यातील ७० लाख विवाहित महिलांना योजनेचा दहावा हप्ता म्हणून ४ डिसेंबर रोजी एकूण ६५२.०४ कोटी रुपये जारी केले आहेत. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत ७० लाख महिलांच्या बँक खात्यांवर ५,००० कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे.
महतरी वंदन योजना काय आहे?
महतरी वंदन योजने अंतर्गत २१ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना दरमहा १,००० रुपये दिले जातात. यामध्ये सर्व विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांचा समावेश आहे. छत्तीसगड सरकारने ५ फेब्रुवारी २०२४ पासून या योजनेसाठी नोंदणी सुरू केली होती. पहिला हप्ता १० मार्च रोजी पीएम मोदींच्या हस्ते जारी करण्यात आला होता. सध्या ७० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.