आपल्यापासून ४० प्रकाशवर्षे दूर असलेल्या जीजे १२१४  बी (गिलीस १२१४ बी) या ग्रहावरील वातावरणात भरपूर पाणी असल्याचा निष्कर्ष खगोल वैज्ञानिकांनी काढला आहे. हा ग्रह सुपर अर्थ म्हणजे महापृथ्वी प्रकारातील आहे. या ग्रहाच्या अधिक्रमणाचा अभ्यास करण्यासाठी निळय़ा रंगाच्या फिल्टर्सचा वापर करण्यात आला होता.
जपानी खगोल वैज्ञानिक व ग्रह संशोधकांनी सुबारू दुर्बिणीच्या सुप्रीम-कॅम व फेंट ऑब्जेक्ट कॅमेरा या दोन प्रकाशीय कॅमेऱ्यांचा तसेच वर्णपंक्तिमापी म्हणजे स्पेक्ट्रोग्राफचा वापर या ग्रहाच्या निरीक्षणासाठी केला.
महापृथ्वी म्हणून गणल्या गेलेल्या या ग्रहावरील वातावरणात पाणी किंवा हायड्रोजन यांचे प्रमाण किती आहे याचा शोध या वेळी घेण्यात आला. सुबारू दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणात तेथील आकाशामध्ये रेलिग विकिरण हा गुणधर्म फारसा तीव्रतेने दिसून आला नाही, त्यामुळे या ग्रहावर पाण्याने परिपूर्ण किंवा हायड्रोजनचे जास्त प्रमाण असलेले ढग मोठय़ा प्रमाणात असावेत असे स्पष्ट होत आहे. इतर रंगांच्या निरीक्षणांशी तुलना केली असता निळय़ा फिल्टरच्या मदतीने केलेली निरीक्षणे जीजे १२१४ या ग्रहावर मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे दर्शवतात. जीजे १२१४ या महापृथ्वी प्रकारातील दाखवणाऱ्या ४० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाचे वातावरणीय गुणधर्म शोधण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे. हा ग्रह आकाशगंगेच्या मध्यभागी ईशान्येकडे असलेल्या भुजंगधारी तारकासमूहात आहे. या ग्रहाचे त्याच्या ताऱ्यासापेक्ष अधिक्रमण अभ्यासण्यात आले असून, या ग्रहाभोवती दाट वायूची चकती दिसून आली आहे.
या चकतीत हायड्रोजन व बर्फाच्या रूपातील पाणी यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. त्याच्या बाहेरच्या भागात हिमरेषा स्पष्टपणे जाणवते. ग्रहांच्या अधिक्रमणामुळे मातृताऱ्याच्या प्रकाशाची तरंगलांबी बदलते, त्यामुळे तेथील वातावरणाचा अभ्यास करणे शक्य होते.
महापृथ्वी ग्रह
सुपर अर्थ म्हणजे महापृथ्वी ग्रह हे असे बाहय़ग्रह आहेत, की ज्यांचे वस्तुमान व त्रिज्या हे दोन्ही पृथ्वीपेक्षा जास्त असतात, पण सौरमालेतील युरेनस किंवा नेपच्यूनसारख्या इतर बर्फाळ ग्रहांपेक्षा मात्र त्यांची त्रिज्या व वस्तुमान कमी असते. या प्रकारच्या ग्रहांचे जे संशोधन झाले आहे, त्यानुसार त्यांच्या वातावरणात हायड्रोजन व पाण्याची वाफ  मोठय़ा प्रमाणात असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा