रिओ दि जानेरिओ : ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष लुला द सिल्व्हा यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आणि धुडगूस घालणाऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करा. त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, अशा घोषणा मंगळवारी अध्यक्ष लुला यांच्या समर्थकांनी दिल्या.
माजी अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांचा अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गेले दोन दिवस संसद, सर्वोच्च न्यायालय आणि अध्यक्षीय प्रासादावर हल्ला चढविला. त्यांना प्रतिकार करण्यासाठी मंगळवारी अध्यक्ष लुला यांचे समर्थक एकत्र आले.
साओ पाओलोमधील विधि महाविद्यालयाच्या हॉलमध्ये लुला यांचे समर्थक एकत्र आले आणि त्यांनी दंगेखोरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या हातात निषेध फलक होते ते साओ पाओलोच्या रस्त्यावर उतरले. रिओ दि जानेरिओ या शहरातही लुला यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. हा ब्राझीलियन नागरिकांचा आवाज असल्याचे या समर्थकांनी सांगितले. ‘देशात दंगे करणाऱ्या आणि हे दंगे भडकविण्यासाठी मदत करणाऱ्यांना शिक्षा करणे आवश्यक आहे. दंगे करण्याचे आदेश देणाऱ्यांना आणि दंगे करण्यासाठी पैसे देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ असे या आंदोलकांनी सांगितले. काही नागरिकांच्या वस्त्रांवर ‘लोकशाही’ हा शब्द लिहिण्यात आला होता. ‘आम्ही ब्राझीलचे प्रतिनिधित्व करतो, दंगे करणारे ब्राझीलचे प्रतिनिधित्व करत नाहीत,’ असे काही आंदोलकांनी सांगितले.