पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने रविवारी बिहारमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काढण्यात आलेल्या ‘जन विश्वास यात्रे’ची सांगता रविवारी पाटण्याच्या गांधी मैदानात झाली. यावेळी झालेल्या विशाल ‘जन विश्वास महा रॅली’मध्ये ‘इंडिया’ आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा >>> नरेंद्र मोदींमुळेच प्रज्ञासिंह ठाकूर यांना तिकीट नाकारलं? खुद्द प्रज्ञासिंह म्हणाल्या, “कदाचित…”
सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी राजा इत्यादी नेते उपस्थित होते. राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’मधून वेळ काढून या सभेसाठी उपस्थित राहिले. आपल्या १५ मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली. हे सरकार केवळ दोन-तीन मोठया उद्योगपतींसाठी काम करत असून देशाच्या लोकसंख्येच्या ७३ टक्के भाग असलेल्या दलित आणि मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.
हेही वाचा >>> राजकारणात उतरण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतली निवृत्ती; भाजपाकडून स्वागत
मल्लिकार्जुन खरगे आणि लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या इंडिया आघाडी सोडून रालोआकडे जाण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली. तसेच १७ महिन्यांच्या कालावधीत मोठया प्रमाणात रोजगारनिर्मिती केल्याबद्दल लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांची पाठ थोपटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रामधील सत्तेतून घालवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. तर, अखिलेश यादव म्हणाले की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एकूण १२० जागा आहेत. या दोन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाल्यास त्यांना केंद्रात सरकार स्थापन करता येणार नाही. सीताराम येचुरी, डी राजा आणि दीपंकर भट्टाचार्य या डाव्या आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली.