शिक्षा भोगण्यासाठी शरण येण्यास सहा महिन्यांचा कालावधी वाढवून द्यावा, या मागणीसाठी अभिनेता संजय दत्त याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता बुधवारी सकाळी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तची याचिका दाखल करून घेतली असून, बुधवारी त्यावर सुनावणी होईल.
आपण काम करीत असलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण अपुरे असून, त्यावर कोटय़वधी रुपये गुंतले आहेत, अशी सबब सांगत शरणागती पत्करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या विनंतीसाठी संजय दत्त याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी असून, त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला १८ एप्रिल रोजी शरणागती पत्करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने शरणागतीसाठी दिलेली मुदत संपण्यास अवघे तीन दिवस उरलेले असतानाच संजयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शरणागतीस मुदतवाढ देण्याची विनंती केली. आपण भूमिका करीत असलेल्या बहुतांशी चित्रपटांचे चित्रीकरण अपुरे आहे. या चित्रपटांमध्ये निर्मात्यांचे कोटय़वधी रुपये गुंतलेले आहेत. आपण दिलेल्या मुदतीत शरणागती पत्करली, तर या चित्रपटांवर परिणाम होऊ शकतो, असे त्याने याचिकेत म्हटले आहे.

Story img Loader