राजस्थानच्या अलवारमध्ये गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत मुस्लिम युवकाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राजस्थानसह चार राज्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राजस्थान, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना येत्या तीन आठवड्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसला तपशीलवार स्पष्टीकरण द्यावे लागेल. या राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांकडून सुरू असलेल्या कृत्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता न्यायालयाने संबंधित राज्यांना स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अलवारमध्ये कत्तलखान्यासाठी गायी नेत असल्याच्या संशयावरुन गोरक्षकांनी काही जणांना बेदम मारहाण केली होती. त्यापैकी एका जणाचा राजस्थानमधील अलवार येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अलवार महामार्गावर गोरक्षकांनी सहा वाहने अडवली होते. त्या वाहनांत काही गायी होत्या. गायी नेणारे सर्व जण मुस्लिम होते. त्यांना त्याच वेळी मारहाण करण्यात आली.  राजस्थानमधून गायी घेऊन ते हरियाणामध्ये जात होते. राजस्थानच्या गोवंश हत्या प्रतिबंध कायदा १९९५ नुसार कत्तलीसाठी गोवंशातील जनावरे वाहून नेण्याची परवानगी नाही परंतु शेतीच्या कामासाठी किंवा दुभदुभत्याच्या व्यवसायासाठी तुम्ही ही जनावरे पूर्व परवानगी घेऊन नेऊ शकतात. त्यांच्याजवळ ही परवानगी होती की नाही याबाबत पोलिसांकडे अद्याप माहिती उपलब्ध नाही. अलवार महामार्गावर २०० हून अधिक गोरक्षकांनी वाहनांची तपासणी केली. या वाहनांमध्ये गायी पाहून वाहून नेणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याआधी गुजरात सरकारने गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणली. गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा होती. त्यात सुधारणा करुन जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे.