cash found at Delhi High Court judges Home : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शासकिय निवासस्थानाला आग लागल्याच्या घटनेनंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याच प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींच्या होत असलेल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
न्यायाधीश यशवंत वर्मा यांची सर्वोच्च न्यायलयाच्या कॉलेजियमकडून शिफारस करण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. बंगल्याला आग लागल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
न्यायमूर्तांवर आरोप झाल्यावर काय होतं?
कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कधी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर गैरवर्तवणूकीचे आरोप केले जातात तेव्हा त्या संबंधीत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशांना याबद्दलचा अहवाल सादर करावा लागतो. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर आरोप केले जातात तेव्हा भारताच्या सरन्यायाधीशांच्या पुढाकाराने इन-हाऊस समिती स्थापन केली जाते.
यापूर्वी घडलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती शेखर यादव आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सीएस करनान यांच्या प्रकरणात देखील हीच प्रक्रिया केली हेली होती.
प्रकरणाबद्दल माहितीचा आढावा घेतल्यानंतर सीजेआ संजीव खन्ना यांनी कॉलेजियमची बैठक बोलवली, ज्यामध्ये एकमताने न्यायमूर्ती वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, जेथे त्यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२१ पर्यंत काम केले आहे.
कॉलेजियमच्या काही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली की फक्त न्यायमूर्ती वर्मा यांची बदली केल्याने न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होईल आणि कायदेशीर व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होईल. तसेच त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जर त्यांनी नकार दिला तर संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
प्रकरण काय आहे?
१४ मार्च रोजी न्या. वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात अचानक आग लागली. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी एका खोलीत खूप मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आग लागली त्यावेळी न्या. वर्मा घरात उपस्थित नव्हते.