मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची (कॉलेजियम) बैठक पार पडली. या बैठकीत कॉलेजियमने सात न्यायिक अधिकारी आणि दोन वकिलांना विविध उच्च न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस केली. यामध्ये वकील नीला केदार गोखले यांचाही समावेश आहे. वकील नीला केदार गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

नीला गोखले यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये वकील म्हणून काम केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या वकील म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं. मुंबई उच्च न्यायालयात सध्याच्या घडीला ६५ न्यायाधीश असून मंजूर न्यायाधीशांची संख्या ९४ इतकी आहे.

हेही वाचा- विश्लेषण : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय आहे? कर्नल पुरोहितचे कनेक्शन काय?

नीला गोखले यांच्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून वकील नागेंद्र रामचंद्र नाईक यांच्या नावाची शिफारस केली. विशेष म्हणजे यापूर्वी दोनदा केंद्र सरकारने नाईक यांच्या नावावर आक्षेप घेत फाइल परत पाठवली होती. मंगळवारी कॉलेजियमच्या बैठकीत तिसऱ्यांदा नागेंद्र नाईक यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

मालेगाव स्फोट प्रकरण आहे तरी काय?
सन २००८ मध्ये, रमजान सण काही तासांवर येऊन ठेपल्याने नवे कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लीम आबालवृद्धांची लगबग सुरू असताना २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास गजबजलेल्या भिक्कू चौकातील एका दुकानाबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीत पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या घटनेत सात जणांचा मृत्यू आणि ९२ जण जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरीही झाली होती.

Story img Loader