एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाबाबत गेल्या दोन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज हा निकाल उद्याच लागणार असल्याचं जाहीर केलं आहे. लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी. कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत”, असं सरन्यायाधीश यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितलं.

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम.शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असं बोललं जात होतं. गेल्या दोन दिवसांपासूनया निकालाच्या चर्चांना जोर आला होता. अखेर, सरन्यायाधीश यांनीच याप्रकरणी खुलासा केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटना

गेल्यावर्षी जून महिन्यात राज्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यसभेची मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतला रवाना झाले. त्यावेळेस शिवसेनेत पडलेल्या ठिणगीची माहिती अवघ्या महाराष्ट्राला मिळाली. त्यानंतर एका पाठोपाठ एक महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटना घडू लागल्या. ठाकरेंच्या गटात असणारे अनेक आमदार हळूहळू शिंदेंच्या गटात सामिल झाले. त्यामुळे शिंदे गटाला बळ मिळाले. या बळाच्या जोरावर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले.

एकनाथ शिंदे यांच्या या बंडाला आणि महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालायत आव्हान देण्यात आले. १६ आमदार अपात्र ठरवण्यात यावे अशीही याचिका यावेळी करण्यात आली होती. याप्रकरणी उद्या निकाल लागणार आहे. त्यामुळे १६ आमदार अपात्र ठरतात का? की विधानसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालय नकार देतंय याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला उद्या ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.