प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले. देशात सध्या जे काही होतंय त्या केवळ ही महिला जबाबदार आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. विशेष म्हणजे यावेळी शर्मा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयाने शर्मांनी भावना दुखावल्या असतील तर असं म्हणत सशर्त माफी मागितल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच त्यावर नाराजी व्यक्त केली.
न्यायमूर्ती सुर्यकांत म्हणाले, “नुपूर शर्मा यांनी कशापद्धतीने भावना भडकावल्या हे आम्ही टीव्हीवरील चर्चेत पाहिलं. ज्या पद्धतीने या महिलेने वक्तव्य केलं आणि नंतर मी एक वकिल असल्याचं सांगितलं ते लज्जास्पद आहे. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.”
शर्मा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचं सांगितल्यानंतर न्यायालयाने ती माफी सशर्त होती, असं नमूद करत शर्मा यांनी टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असं मत मांडलं. शर्मा यांनी आपलं वक्तव्य मागे घेण्यास खूप उशीर केला. त्यानंतरही त्यांनी सशर्त माफी मागितली, याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
“देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”
“नुपूर शर्मांना धमक्या येत आहेत की त्याच सुरक्षेला धोका आहेत? या महिलेने देशभरातील भावनांना चिथावणी दिली आहे. देशात जे काही सुरू आहे त्याला केवळ ही महिला जबाबदार आहे,” असं संतप्त निरिक्षण न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी नोंदवलं.
“राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहात म्हणजे भावना भडकावणारी वक्तव्य करण्याची परवानगी मिळत नाही”
न्यायमूर्ती सुर्यकांत म्हणाले, “एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहात म्हणजे अशाप्रकारे भावना भडकावणारी वक्तव्य करण्याची परवानगी मिळत नाही. हे काही धार्मिक व्यक्ती नाहीत. ते भावना भडकावण्यासाठीच वक्तव्य करतात.”
आरोपी नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी दिल्लीत हस्तांतरीत करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत नुपुर शर्मा यांना धमक्या मिळत असल्याचाही दावा शर्मा यांच्या वकिलांनी केला. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढत नुपुर शर्मा यांना सुनावले.