गुंतवणूकदारांचे २०,००० कोटी देण्यास असमर्थ ठरलेले सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आपल्या कुटुंबीयांसमवेत होळी साजरी करण्यासाठी न्यायालयाने जामीन द्यावा, अशी मागणी रॉय यांनी जामीन याचिकेत केली होती. मात्र न्यायालयाने नकार दिल्याने रॉय यांना तिहार तुरुंगातच होळी साजरी करावी लागणार आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा समूहाने काय पावले उचलली, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. मात्र त्याबाबत योग्य आणि समर्थनीय प्रस्ताव सुब्रतो रॉय सादर करू शकले नाही. गुंतवणूकदारांचे २५०० कोटी रुपये आम्ही आता परत करू आणि उरलेली रक्कम कालांतराने गुंतवणूकदारांना परत करण्यात येईल, असा सहारा समूहाचा प्रस्ताव होता. मात्र तो न्यायालयाकडून तातडीने फेटाळण्यात आला.
‘‘रॉय यांची आई आजारी असल्याने तिला भेटता यावे आणि त्यांना आपल्या कुटुंबीयासमवेत होळी साजरी करता यावी, यासाठी त्यांना जामीन देण्यात यावा,’’ अशी मागणी रॉय यांचे वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी केली होती. मात्र गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबतचा लेखी प्रस्ताव रॉय यांनी सादर करावा, असे न्यायालयाने सांगितले.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी पैशांची व्यवस्था करणे गरजेचे आहे, मात्र रॉय हे तुरुंगात असल्याने पैशांची व्यवस्था करू शकत नाही, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. मात्र तरीही न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आणि या याचिकेवरील सुनावणी २५ मार्चपर्यंत पुढे ढकलली.
सहारा समूहाकडून जर नवा आणि समर्थनीय प्रस्ताव सादर करण्यात आला, तरच रॉय यांच्या जामीन याचिकेवर विचार करण्यात येईल, असे न्या. के. एस. राधाकृष्णन व न्या. जे. एस. खेहार यांच्या खंडपीठाने सांगितले.
उद्योग समूहाच्या अनेक कंपन्या, मात्र काहींवरच रॉय कुटुंब संचालक
गुंतवणूकदारांचे सुमारे २५ हजार कोटी परत न केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या सहारा उद्योग समूहाच्या अनेक कंपन्या आहेत, मात्र त्यापैकी अगदीच मोजक्याच नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळावर सुब्रतो रॉय कुटुंबाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे.गुंतवणूकदारांच्या पैशाच्या मुद्दय़ावर सध्या सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय शिक्षा भोगत आहेत. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सेबीचा ससेमिराही सहारा उद्योगासह सुब्रतो रॉय आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे लागला आहे, मात्र असंख्य कंपन्या या उद्योग समूहाच्या छत्राखाली असल्या तरी अगदी मोजक्याच नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळावर सुब्रतो र*ायच्या पत्नी, भाऊ जॉय ब्रोटो रॉय, दोन मुलगे सीमांतो आणि सुशांतो रॉय हे कार्यरत आहेत. त्यातच सहारा उद्योग समूहाच्या दोन कंपन्या सहारा इंडिया रियल इस्टेट कॉपरेरेशन लि. आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कापरेरेशन लि. यांच्यावर गुंतवणूकदारांचे सुमारे २५ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप सेबीने केला आहे, मात्र या कंपन्यांच्या संचालक मंडळावर सुब्रतो रॉय तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य नसल्याचे समजते.