Narcos And Breaking Bad In Supreme Court : अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी लोकप्रिय टीव्ही शो ब्रेकिंग बॅड आणि नार्कोसचा संदर्भ दिला. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित या दोन लोकप्रिय वेब सीरिजचा सुनावणीदरम्यान उल्लेख केला.
आरोपीच्या वकिलाचा युक्तीवाद
एका आरोपीला अटकपूर्व जामीन नाकारणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या ४ ऑक्टोबरच्या निर्णयाविरुद्धच्या अपीलवर न्यायालय सुनावणी करत होते. या आरोपीकडे एप्रिलमध्ये ७३.८० ग्रॅम स्मॅक (हेरॉइन) सापडले होते. या सुनावणी वेळी आरोपीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, “आरोपीपासून समाजास कोणताही धोका नाही, त्यामुळे त्याला अटक करणे अवास्तव आहे.”
काय म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती?
सुनावणीच्या दरम्यान आरोपीच्या वकिलाने केलेल्या युक्तीवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती सतिश चंद्र शर्मा म्हणाले, “मी तुम्हाला विचारतो की, तुम्ही नार्कोस पाहिली असेल? त्यामध्ये क्वचितच पकडले गेलेले खूप बलाढ्य सिंडिकेट दाखवले आहे. आणखी एक शो जो पाहणे आवश्यक आहे तो म्हणजे ब्रेकिंग बॅड. या देशाच्या तरुणांना अक्षरशः मारणाऱ्या लोकांशी तुम्ही लढू शकत नाही.” न्यायालयाने आज केलेल्या या टिप्पण्यांवरून अंमली पदार्थांची तस्करी, गैरवापर आणि यापासून असणाऱ्या धोक्यांचे गांभीर्य लक्षात येते.
काय आहे नार्कोस?
नार्कोस ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे जी २०१५ मध्ये नेटफ्लिक्सवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. यामध्ये कोलंबियातील कुप्रसिद्ध ड्रग किंगपिन पाब्लो एस्कोबार आणि मेडेलिन कार्टेलच्या उदय आणि पतनाची गोष्ट सांगितली आहे. या शोमध्ये अंमली पदार्थांची तस्करी, भ्रष्टाचार आणि हिंसेचे अंधकारमय जगाचेही चित्रण करण्यात आहे.
ब्रेकिंग बॅड
ब्रेकिंग बॅड ही अमेरिकन क्राईम ड्रामा वेब सिरीज आहे. या मालिकेत वॉल्टर व्हाईट या हायस्कूलच्या रसायनशास्त्र शिक्षकाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये टर्मिनल कॅन्सरचे निदान झाल्यानंतर वॉल्टर व्हाईट मेथॅम्फेटामाइन निर्माता होतो हे दाखवले आहे. वॉल्टरने त्याच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी जेसी पिंकमनसोबत भागीदारी केली, ज्यामुळे ते ड्रग्ज आणि गुन्हेगारीच्या धोकादायक मार्गावर गेले.