जोधपूर येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला वैद्यकीय कारणांसाठी जामीन देण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. दिल्लीतील एम्स रूग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल पाहून न्यायालयाने हा निकाल दिला. आसारामला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसून त्याचा आजार नुसत्या औषधांनीही बरा होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, एम्समधील तब्बल अर्धा डझन डॉक्टरांनी आसारामला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्याच्या आजारावर ओपीडीमध्येही उपचार होऊ शकतात. त्यामुळे या अहवालानंतर आता विशेष असे काही सांगायला उरले नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
दरम्यान, आसाराम याचे वकील सलमान खुर्शिद यांनी या अहवालावर अभ्यास करण्यासाठी न्यायालयाकडून आणखी काही वेळ मागून घेतला. त्यामुळे २० जानेवारी रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. याशिवाय, एम्स रूग्णालयात तपासणीसाठी झालेल्या खर्चाची संपूर्ण रक्कम राजस्थान पोलिसांना देण्याचे आदेश न्यायालयाने आसारामला दिले आहेत.
आसाराम बापू याने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याला आधार म्हणून त्यांनी जोधपूरमधील एका रुग्णालयाचे अहवाल सादर केले होते. त्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नाकारत नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञांकडून फेरतपासणी करून घेण्यास सांगितले होते. तसेच त्यासाठी एम्समध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या सूचना एम्सच्या संचालकांना १५ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा