Nirbhaya Case : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका केली होती. जी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. न्या. आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने ही याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चारही दोषींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे निर्धारित दिवशी आणि त्याच वेळी निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे.

दिल्लीतील निर्भया बलत्कार प्रकरणी चारही दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी दिल्ली न्यायालयाने हा निर्णय देत डेथ वॉरंट जारी केलं होतं. या डेथ वॉरंटमध्ये ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली होती.

दरम्यान त्याच दिवशी आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह याचिका दाखल करायची आहे असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला होता. त्यानुसार ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

काय आहे निर्भया प्रकरण?

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

Story img Loader