पीटीआय, नवी दिल्ली

डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखावेत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावल्या. प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवावे किंवा सगळे काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असे वक्तव्य न्यायालयाने केले आहे.न्या. बेला एम. त्रिवेदी आणि प्रसन्ना बी. वराले यांच्या खंडपीठाने सांगितले, की मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच आखून देण्यात आली आहेत.

याचिकाकर्त्यांना त्यानुसार पुढील प्रक्रिया राबविता येईल, असे खंडपीठ म्हणाले. प्रत्येक कृतीवर न्यायालयाने लक्ष ठेवावे आणि सर्व काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले.डॉक्टरांवरील हल्ल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केल्यानंतर खंडपीठ म्हणाले, ‘डॉक्टरांवरील हल्ल्यांचे हे सर्व प्रकार खूप दुर्दैवी आहेत. पण, सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी बसून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू शकत नाही.’

सर्वोच्च न्यायालयात २०२२ मध्ये तीन याचिका करण्यात आल्या होत्या. डॉक्टरांवरील हल्ल्यांसंदर्भात सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे आखून द्यावेत, अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली होती. राजस्थानमधील एका स्त्री-रोगतज्ज्ञाच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीही करण्याची मागणी यातून करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून, त्याचे पालन होत नसेल, तर ते अवमान होणारे आहे. यावर संसदेने कायदा करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.