नवी दिल्ली : आपल्या वृत्त कार्यक्रमांमधून द्वेष पसरविला जात असेल, तर अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. वाहिन्या हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक पडतो. आपले प्रेक्षक हे कार्यक्रम पाहण्यासाठी पुरेसे प्रगल्भ आहेत का, याचाही विचार केला पाहिजे असे न्यायालयाने म्हटले.
वाहिन्या आणि धर्मसंसदेमधील द्वेषपूर्ण भाषेबद्दल चार याचिकांवर न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी न्या. जोसेफ तोंडी मत मांडताना म्हणाले, की आजकाल प्रत्येक गोष्ट टीआरपीमुळे ठरते आणि वाहिन्यांची एकमेकांशी स्पर्धा आहे. त्यामुळे त्या समाजात दरी उत्पन्न करतात. द्वेष निर्माण करण्यामध्ये एखाद्या वृत्तनिवेदकाचा सहभाग असेल, तर त्याला पडद्यावरून दूर का केले जात नाही, याचे आश्चर्य वाटते. वृत्तपत्रांसाठी असलेल्या प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाप्रमाणे वाहिन्यांसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही, असे निरीक्षण नोंदविताना ‘आपल्याला भाषणस्वातंत्र्य हवे आहे, पण कोणती किंमत मोजून?’ असा सवाल न्यायालयाने केला.
‘मीडिया ट्रायल’बाबत चिंता
एखाद्याचा गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच माध्यमांमध्ये होणारी प्रकरणाची चीरफाड आणि आरोपीला गुन्हेगार सिद्ध करण्याची घाई, यावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली. अलिकडेच एअर इंडियाच्या विमानात लघुशंका केल्याप्रकरणाचा दाखला देत ‘आरोपीवर अद्याप खटला सुरू आहे आणि त्याची बदनामी केली जाऊ नये, हे माध्यमांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाला स्वाभिमान असतो,’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली.