केंद्र सरकारच्या मागणीनंतर आता ईडीचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. संजय मिश्रांना ईडीचे संचालक म्हणून १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संजय मिश्रा हे फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत सहभागी असल्याने राष्ट्रीय हितासाठी त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मोदी सरकारने केली होती. त्यानंतर आता त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र यापुढे संजय कुमार मिश्रांना मुदतवाढ मिळणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

संजय कुमार मिश्रांचा कार्यकाळ वाढवू नये असे आदेश २०२१ मध्येच

संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवू नये असे आदेश २०२१ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर नवी तरतूद करुन त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांच्या मुदतवाढीला न्यायालयाने आक्षेप घेतला होता. संजय मिश्रा यांचा ईडीचे संचालक म्हणून कार्यकाळ ३१ जुलैपर्यंत होता त्या दरम्यान केंद्र सरकारने नवीन संचालकांची निवड करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी एक आठवडा बाकी असताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा संजय मिश्रांना मुदतवाढ दिली जावी अशी मागणी करत तो अर्ज सर्वोच्च न्यायालयात दिला होता.

संजय मिश्रा यांना १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये दोन वर्षांसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये मिश्रा पदमुक्त होणार होते. त्याआधीच मे महिन्यात त्यांनी वयाची ६० वर्ष पूर्ण केली. याचा अर्थ त्यांनी निवृत्तीचे वय गाठले. नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांचा कार्यकाळ दोनऐवजी तीन वर्षांचा करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्रीय दक्षता आयोग (CVC) अधिनियम अंतर्गत एक सुधारणा अध्यादेश जारी केला. त्यानुसार, संजय मिश्रा यांचा कार्यकाळ १८ नोव्हेंबर २०२३ रोजी संपणार होता. आता, त्याआधीच सुप्रीम कोर्टाने ही सुधारणा रद्द केली.

कोण आहेत संजय मिश्रा?

संजय मिश्रा हे १९८४ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये, संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक बनवण्यापूर्वी त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवण्यात आले होते. मिश्रा यांना आर्थिक तज्ञ देखील म्हटले जाते आणि त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांची ईडी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.