महेश सरलष्कर
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे अखेरचे चार टप्पे उरले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केल्यामुळे भाजपविरोधातील विरोधकांचा प्रचार अधिक धारधार आणि तितकाच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राष्ट्रीय स्तरावर मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे असे ‘इंडिया’तील प्रामुख्याने सहा नेते भाजप व मोदींना तगडे प्रत्युत्तर देत आहेत. त्यामध्ये अचूक वेळी मुरब्बी केजरीवालांची भर पडली आहे. दिल्लीमध्ये २५ मे रोजी मतदान होणार असून पुढील १३ दिवसांमध्ये भाजपविरोधात केजरीवालांच्या आक्रमकतेचा नवा अवतार पाहायला मिळू शकेल. केजरीवालांसाठी भाजप म्हणजे एखाद्या सावजासारखे असेल. केजरीवालांना मिळालेला जामीन ‘इंडिया’साठी वरदान ठरण्याची शक्यता मानली जात आहे.
हेही वाचा >>>तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”
केजरीवालांना ‘ईडी’ने अटक केल्यामुळे आम आदमी पक्ष कमालीचा हतबल झाला होता. काँग्रेससह ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या मानसिक खच्चीकरणाचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात होता. अटकेपूर्वी केजरीवालांनी दिल्ली, गुजरातसह मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये लोकसभेच्या प्रचाराला वेग दिला होता. दिल्लीमध्ये काँग्रेस व ‘आप’ची आघाडी झाली असून इथेही केजरीवालांनी भाजपविरोधात टोकदार प्रचार सुरू केला होता. केजरीवालांच्या अटकेमुळे ‘आप’च्या प्रचाराची घोडदौड अचानक खंडित झाली. आता केजरीवाल जोशात दिल्लीमध्ये प्रचार करू शकतील. त्यामुळे दिल्लीत ‘आप’च्या ताकदीवर अवलंबून असलेल्या काँग्रेसलाही बळ मिळाले आहे.
केजरीवालांना अटक करून भाजपने राजकीय कुऱ्हाड पायावर मारून घेतल्याचे मानले जात होते. जामिनावर सुटलेले संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज आदी आपच्या नेत्यांनी भाजपकडून होणाऱ्या ‘तोफगोळय़ा’नंतरही ‘आप’चा किल्ला कोसळू दिला नाही. ‘आप’ला खिंडार पाडण्याचे भाजपचे प्रयत्नही केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडले. शिवाय, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल थेट मैदानात उतरून ‘आप’चे नेतृत्व करून लागल्याने भाजपला ‘आप’वर दबाव टाकण्यात फारसे यश आले नाही. त्या दिल्लीत प्रचारासाठी फिरत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.