माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. स्वत:ची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी मागील जवळपास साडे सहा वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालायने शीना बोरा हत्याकांड प्रकरणात त्यांना दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे.

इंद्राणी मुखर्जी यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं की, या प्रकरणाची सुनावणी बराच काळ चालू शकते. हे संपूर्ण प्रकरण केवळ परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा खटला लवकर संपणार नाही. प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपी व्यक्ती जामिनाचा हक्कदार असते, असं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही इंद्राणी मुखर्जीला सशर्त जामीन मंजूर करत आहोत.

या प्रकरणातील सहआरोपी पीटर मुखर्जी यांची २०२० मध्ये जामिनावर सुटका झाल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं. यापूर्वी सीबीआयने इंद्राणी मुखर्जीच्या जामिनाला विरोध केला होता. सीबीआयने निवेदनात म्हटलं होतं की, इंद्राणी मुखर्जी यांनी स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या करण्याचं घृणास्पद कृत्य केलं आहे. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जाबाबत सीबीआयला नोटीस बजावली होती आणि उत्तर मागितलं होतं.

इंद्राणी मुखर्जीचे वकील मुकुल रोहतगी न्यायालयात म्हणाले की, इंद्राणी मुखर्जी मागील साडे सहा वर्षांपासून तुरुंगात आहे. पुढील १० वर्षांतही हा खटला संपणार नाही. १८५ साक्षीदार तपासाणं अद्याप बाकी आहे. मागील दीड वर्षाच्या काळात एकाही साक्षीदाराची चौकशी झालेली नाही. तसेच इंद्राणी यांचा नवरा जामिनावर बाहेर आहे. इंद्राणी मुखर्जीलाही मानसिक आजार आहेत. इंद्राणी मुखर्जी सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अलीकडेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. पण उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही.