राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेले दोन महिने ते तुरुंगात होते. त्यांना चारा घोटाळाप्रकरणी पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. न्या. पी. सतशिवम यांनी लालूंना जामीन मंजूर केला असून या प्रकरणी अशाच पद्धतीने दोषी ठरवलेल्या इतरांनाही आधीच झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, या मुद्दय़ावर लालूंना जामीन मंजूर करण्यात आला.  
फिर्यादी पक्ष असलेल्या सीबीआयने लालूप्रसाद यांच्या जामिनास विरोध केला नाही. लालूंबरोबर दोषी ठरवण्यात आलेल्या ४४ पैकी ३७ जणांचे जामीन झारखंड उच्च न्यायालयाने मंजूर केले होते. फक्त लालूंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून तेच आपल्या पतीला न्याय देतील असा विश्वास लालूप्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
लालूंना जामीन देणाऱ्या न्यायालयाच्या पीठात न्या. रंजन गोगोई यांचाही समावेश असून जामिनाच्या जातमुचलक्याबाबत निर्णय घेण्याची बाब तसेच लालूंवर कुठल्या अटी लादायच्या हे कनिष्ठ न्यायालयांवर सोडण्यात आले आहे. खासदारकी गमावलेले लालूप्रसाद यादव यांच्यासह ४४ जणांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. त्यापैकी ३७ जणांना जामीन मंजूर झाला आहे फक्त एकाचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.
विविध पक्षांनी लालूंच्या जामिनावर सुटण्याचे स्वागत केले असून जनता दल संयुक्तचे शिवानंद तिवारी यांनी सांगितले की, त्यांना जामीन मिळाला हे चांगले झाले. दरोडेखोर व लुटारू यांना जामीन मिळतो त्यामुळे लालूंना जामीन मिळण्यात आश्चर्य नाही. तरीही आपल्याला आनंद वाटला. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की, त्यांना आधीच जामीन मिळायला हवा होता. उच्च न्यायालयाने त्याना जामीन नाकारला ते चुकीचे होते. कायदा मंत्री कपील सिब्बल यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. लालूजींना जामीन मिळाला हे चांगले झाले. निवडणुका जवळ आल्या आहेत आणि ते एका मोठय़ा राजकीय पक्षाचे नेते आहेत. कायद्यानुसार सर्वकाही व्हायला पाहिजे, त्यांना जामीन देण्याचे आम्ही स्वागत करतो. राजदचे नेते रामकृपाल यादव यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो लालूंच्या सुटकेने पक्ष कार्यकर्त्यांत चैतन्य येईल.
राम जेठमलानींचा युक्तीवाद
वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांनी लालूप्रसाद यांच्या वतीने युक्तिवाद करताना सांगितले की, लालूप्रसाद यांनी १२ महिने तुरुंगात काढले आहेत त्यात आताच्या दोन महिन्यांचाही समावेश आहे. झारखंड उच्च न्यायलयापुढे लालूंचे अपील पडून आहे त्याच्या सुनावणीस सात ते आठ वर्षे लागतील त्यामुळे लालूंना जामीन मंजूर करण्यात यावा. झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यांचा जामीन फेटाळून लावला होता त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. लालूप्रसाद यांनी जामिनासाठीच्या अर्जात म्हटले आहे की, जामीन नाकारण्यास कोणतेही कारण न्यायालयाने दिलेले नाही. तसेच जामिनाच्या बाबतीत काही सहआरोपींना एक न्याय व आपल्याला वेगळा न्याय अशा पद्धतीने वागवले जात आहे.
बुडाला यादवी पापी
लालूंच्या मेव्हण्याचे मोदींशी गुफ्तगू

Story img Loader