गेल्या आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस ठाकरे गटानं युक्तिवाद केल्यानंतर या आठवड्यात शिंदे गटाकडून वकील नीरज कौल बाजू मांडत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी चालू असून पक्षाचा व्हीप मोडल्यामुळे शिंदे गटाच्या ४२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आज युक्तिवाद करताना शिंदे गटाकडून थेट आकडेवारीच सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

काय आहे मुद्दा?

ठाकरे गटाच्या वतीने वकील नीरज कौल युक्तिवाद करत आहेत. यावेळी सुनावणीदरम्यान जर आमदार अपात्र ठरले असते, तर एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली असती का? असा प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. यावर बोलताना नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर आकडेवारी सादर केली. विधानसभा अध्यक्षांनी जर आमदारांना अपात्र ठरवलं असतं, शिंदे गटाचे ४२ आमदार अपात्र ठरले असते, तरी उद्धव ठाकरे सरकार पडलंच असतं, असा दावा नीरज कौल यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एकूण आमदारसंख्या आणि बहुमताचं गणित न्यायालयासमोर ठेवलं.

“…अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का?” शिंदे गटाचा सवाल!

काय आहे आकडेवारी?

नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात पुढील आकडेवारी सादर केली…

बहुमत चाचणी – ४२ सदस्य धरून

शिवसेना – ३९

भाजपा – १०५

इतर – २०

एकूण मतं मिळाली – १६४

विरोधात – ९९

गैरहजर – २४

सभागृह संख्या – २८७

गैरहजर वगळता – २६३

बहुमताचा आकडा – १३२

सरकारच्या बाजूने मिळाले – १६४

ही आकडेवारी दिल्यानंतर नीरज कौल यांनी ४२ आमदार अपात्र ठरले असते, तर काय चित्र निर्माण झालं असतं, त्याचीही आकडेवारी सादर केली.

बहुमत चाचणी – ४२ सदस्य वगळून

शिवसेना – ०

भाजपा – १०५

इतर – २०

एकूण मतं मिळाली – १२२

विरोधात – ९९

गैरहजर – २४

सभागृह संख्या – २४५

गैरहजर वगळता – २२१

बहुमताचा आकडा – १११

सरकारच्या बाजूने – १२२

या आकडेवारीच्या आधारावर नीरज कौल यांनी कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकार पडलंच असतं, असा दावा केला आहे. शिंदे गटाचे ४२ आमदार वगळूनही एकनाथ शिंदे सरकार बहुमतामध्येच राहिलं असतं, असंही कौल यांचं म्हणणं आहे.

मविआचे आमदारही ठाकरेंच्या बाजूने नाहीत!

दरम्यान, नीरज कौल यांनी युक्तिवादादरम्यान मविआच्या आमदारांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. शपथविधीनंतर ४ जुलै रोजी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये एकूण २४ आमदार गैरहजर होते. त्यातले १३ आमदार हे महाविकास आघाडीचे होते, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला. “त्यांचे स्वत:चे आमदारही त्यांच्या पाठिशी नव्हते”, असं नीरज कौल यावेळी म्हणाले.

Live Updates
Story img Loader