Supreme Court to IIT Dhanbad Cannot Waste Young Talent over Money : दिलेल्या मुदतीत शुल्क न भरू शकल्यामुळे एका दलित विद्यार्थ्याला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश घेता आला नव्हता. मात्र, या प्रकरणावरून आयआयटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने आज (३० सप्टेंबर) एक महत्त्वाचा निकाल दिला. याप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी धनबदाला निर्देश दिले आहेत की त्यांनी त्या दलित विद्यार्थ्याला आयआयटीत प्रवेश द्यावा. घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे हा तरुण आयआयटीचं शुल्क भरू शकला नव्हता. त्यानंतर या विद्यार्थ्याने थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात राहणाऱ्या एका मजुराचा मुलगा अतुल कुमार (१८) मोठ्या कष्टाने जेईई परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला आयआयटी धनबादमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागातील सीट मिळाली होती. २४ जून २०२४ पर्यंत त्याला शुल्क भरावं लागणार होतं. मात्र तो वेळेत पैशांची जमवाजमव करून शुल्क भरू शकला नव्हता. त्यामुळे त्याची सीट रद्द केली गेली.

त्यानंतर अतुलने झारखंड उच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. तिथे त्याला न्याय मिळाला नाही. अखेर अतुलने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. सोमवारी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आयआयटीवर नाराजी व्यक्त केली. तसेच न्यायमूर्ती म्हणाले, आपण अशी प्रतिभा गमावू शकत नाही. आपण या तरुण मुलांमधील प्रतिभेला प्रोत्साहन द्यायला हवं. हा विद्यार्थी झारखंड न्यायालयात गेला, मग मद्रास उच्च न्यायालयात गेला, सगळ्यांनी दिलेले धक्के पचवून तो आज सर्वोच्च न्यायालयासमोर आला आहे.

हे ही वाचा >> भगत सिंग निर्दोष होते! पाकिस्तानी वकिलाची ११ वर्षांपासून कायदेशीर लढाई; लाहोरमधील चौकाला नाव देण्यासाठी संघर्ष, पण…

अतुलचे वडील दिवसाला ४५० रुपये कमावतात

अतुलच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की त्याचे वडील मजुरी करतात. त्यातून त्यांना दिवसाला ४५० रुपये मिळतात. इतक्या गरीब कुटुंबासाठी १७,५०० रुपये जमवणं अवघड काम होतं. अतुलच्या वडिलांनी गावातील इतर लोकांकडून उधार पैसे घेऊन १७ हजार रुपये जमवले. परंतु, त्यांना हे पैसे जमवण्यास थोडा उशीर झाला होता.

दरम्यान, न्यायमूर्ती पारदीवाला यांनी आयआयटी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. ते आयआयटीच्या वकिलांना म्हणाले, “तुम्ही इतका विरोध का करताय? काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न का करत नाही? तुम्ही त्याला सीट अलॉटमेंटची पावती दाखवून लगेच पेमेंट करण्यास सांगाल. त्याला थोडा वेळ द्यायला हवा होता”.

हे ही वाचा >> CJI Chandrachud : “Yeah म्हणायला हे कॉफी शॉप नाही”, सरन्यायाधीश चंद्रचुडांनी वकिलाला झापलं; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

सरन्यायाधीशांची नाराजी

सरन्ययाधीश यावर म्हणाले, “अतुल एक उत्कृष्ट विद्यार्थी आहे. तुम्ही (आयआयटी) केवळ १७ हजार रुपयांसाठी त्याला थांबवलंत”. आयआयटीने २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शुल्क भरण्याची मुदत दिली होती. अतुलच्या कुटुंबाने त्या दिवशी पैशांची व्यवस्था केली. मात्र सायंकाळी आयआयटीचं पोर्टल सुरळीत चालत नव्हतं. त्यामुळे त्यांना शुल्क भरता आलं नव्हतं.

सरन्यायाधीशांनी आयआयटी धनबादला आदेश दिले की त्यांनी अतुलचा प्रवेश करून घ्यावा. तसेच “अशा प्रतिभा वाया घालवू नका” असं म्हणत आयआयटीला बजावलं. यासह सरन्यायाधीशांनी अतुलला पुढीच वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court helps dalit student admission in iit dhanbad atul kumar asc