Supreme Court to hear High Court’s ‘grabbing breasts not rape attempt’ Judgment : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने १७ मार्च रोजी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने संज्ञान घेत सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या खटल्यात दोन आठवड्यांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल वादग्रस्त ठरला होता. पीडितेच्या स्तनांना स्पर्श करणे, तिच्या पायजम्याची नाडी तोडणे आणि पीडितेला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा नाहीत, असं अलाहाबद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा म्हणाले होते.
मिश्रा यांनी नोंदवलेलं निरीक्षण वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्यासह अनेकांनी न्यायमूर्ती मिश्रा यांच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई व न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह याप्रकरणी बुधवारी (२६ मार्च) सुनावणी करणार आहेत. कारण, उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर देशभरातून नाराजीचा सूर उमटला होता.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं?
अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या एकलपीठाने आपला निकाल देताना म्हटलं होतं की “गुन्हा करण्याची तयारी आणि वास्तवात गुन्हा करणे यात खूप अंतर आहे.” अल्पवयीन मुलीने दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात तिने म्हटलं होतं की आरोपींनी तिच्या गुप्तांगांना स्पर्श केला, पायजम्याची नाडी तोडून तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला गेला.
उत्तर प्रदेशमधील एका कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३७६ (बलात्काराचा प्रयत्न) व लैंगिक गुन्ह्यांपासून लहान मुलांचे संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्याच्या कलम १८ अंतर्गत गुन्हा दाखल करणे व याप्रकरणी खटल्याला सामोरे जाण्यासंदर्भात समन्स बजावलं होतं. मात्र, आरोपींनी याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती जी उच्च न्यायालयाने अंशतः स्वीकारली होती. त्यानंतर न्यायमूर्तींनी याप्रकरणी नोंदवलेल्या निरीक्षणाविरोधात देशभरातून नाराजीचा सूर उमटला.
प्रकरण काय?
उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे दोन आरोपींनी एका ११ वर्षीय मुलीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तिच्या छातीला स्पर्श केला, तिच्या पायजम्याची नाडी तोडली, तसेच तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पादचाऱ्यांनी या दोघांना हटकल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला होता.
ताजी अपडेट (२६ मार्च, दुपारी १२ वाजता)
दरम्यान, काही वेळापूर्वी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या त्या वादग्रस्त निकालावर स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की “अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा निकाल पूर्णपणे असंवेदनशील व अमानवी दृष्टीकोन दर्शवतो.” तर, न्यायमूर्ती बी. आर. गवई म्हणाले, “उच्च न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक होता.”