Supreme Court Judge Sanjay Karol: महिला सशक्तीकरण व महिलांच्या हक्कांचं रक्षण अशा मुद्द्यांवर वारंवार भारतात सामाजिक व राजकीय स्तरावर चर्चा होताना पाहायला मिळते. त्याचवेळी देशाच्या न्यायव्यवस्थेसमोरही महिला हक्कांसंदर्भातले अनेक खटले सुनावणीसाठी येत असतात. अशा काळात अजूनही असंख्य महिलांची स्थिती सुधारली नसल्याची बाब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांनी अधोरेखित केली आहे. त्यांनी एका भाषणादरम्यान स्वत: काढलेला एक फोटो दाखवून महिलांच्या अवस्थेबाबत भाष्य केलं.

शनिवारी पहिल्या इंटरनॅशनल सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड लीगल कॉन्फरन्स अर्थात SCAORA मध्ये न्यायमूर्ती संजय करोल आपली भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी स्वत: २०२३ साली काढलेला एक फोटो त्यांनी उपस्थितांना दाखवला. हा फोटो एका गावातल्या घराबाहेर बसलेल्या एका महिलेचा आहे. एका तंबूच्या खाली एक महिला बसल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

हा फोटो नेमका कुठे काढला, याबाबत न्यायाधीश संजय करोल यांनी स्पष्ट भाष्य केलं नाही. पण या फोटोच्या माध्यमातून त्यांनी बिहार व त्रिपुराच्या दुर्गम भागातील महिलांच्या स्थितीविषयी भाष्य केलं. बार अँड बेंचनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचायला हवं”

“हा फोटो मी एका दुर्गम अशा गावात काढला होता. हा फोटो एका महिलेचा आहे. या महिलेला महिन्यातल्या मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांमध्ये आपल्याच घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या काळात महिला शारिरीक बदलांचा सामना करत असतात. हा तो भारत आहे, ज्यात आपण राहात आहोत. आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचायला हवं”, असं न्यायाधीश संजय करोल यांनी यावेळी नमूद केलं.

Supreme Court : “हा प्रक्रियेचा दुरुपयोग…”, हिंदुत्व शब्द बदलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

हा फोटो दाखवताना न्यायमूर्ती संजय करोल यांनी सामाजिक न्याय व महिलांच्या अधिकारांच्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महिला अधिकारांच्या बाबतीत न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या ठाम भूमिकेच्या उदाहरणांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “ही उदाहरणं अशा लोकांची आहेत, त्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणं शक्य होतं. जे सुशिक्षित होते आणि प्रामुख्याने शहरांमध्ये राहात होते. पण भारत दिल्ली नाही. भारत मुंबई नाही. आपण न्यायव्यवस्थेचे सदस्य म्हणून भारताच्या संविधानाचे रक्षणकर्ते आहोत. आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल ज्यांना हेदेखील माहिती नाही की न्याय म्हणजे काय”, अशी भूमिका त्यांनी मांडली.