SC judges assets: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी होळीच्या दिवशी कथित नोटांचे बंडल सापडले असल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर अग्निशामक दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका खोलीत मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली होती. यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत न्या. यशवंत वर्मा यांची बदली केली. या प्रकरणातील चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही, मात्र न्यायिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी निर्णय घेतला आहे की, ते त्यांची संपत्ती उघड करणार आहेत.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, १ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बैठक पार पडली. यात न्यायाधीशांनी एकमताने संपत्ती उघड करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे अधिकृत पत्रक अद्याप सार्वजनिक झालेले नाही. संपत्तीची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
न्या. यशवंत वर्मा प्रकरण काय आहे?
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली होती. न्या. वर्मा त्यादिवशी घरात नव्हते. घरातील सदस्यांनी फोनवरून अग्निशामक दल आणि पोलिसांना आग लागल्याबाबत माहिती दिली. आग विझवल्यानंतर अग्निशामक दलाला बंगल्यातील काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आरोप करण्यात आला. यासंबंधीचा एक व्हिडीओही समोर आला होता. मात्र त्याच्या वैधतेबाबत कुणीही अद्याप माहिती दिलेली नाही.
सदर माहिती मिळाल्यानंतर, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायवृदांची बैठक बोलावली आणि न्या. वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेतला.