गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण असा निकाल दिला. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी ठाकरे सरकारला पाचारण करण्याचा निकाल न्यायालयाने वैध ठरवला. पण उद्धव ठाकरेंनी चाचणीआधीच राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं. महत्त्वाची बाब म्हणजे १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या घटनापीठात समावेश असणारे न्यायमूर्ती शाह आज निवृत्त होत असून त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह आज निवृत्त होत आहेत. शाह यांच्या निवृत्तीमुळेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष १५ मेच्या आत लागणार अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार हा निकाल ११ मे रोजी जाहीर करण्यात आला. ठरल्यानुसार आज न्यायमूर्ती शाह निवृत्त होत असताना त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली.
काय म्हणाले न्यायमूर्ती एम. आर. शाह?
न्यायमूर्ती शाह यांनी या भाषणात आपण निवृत्त होणाऱ्यांमधले नसल्याचं नमूद केलं आहे. “मी निवृत्त होणाऱ्यांमधला नाही. मी माझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करेन. मी अशी प्रार्थना करतो की मला या नव्या इनिंगसाठी ईश्वर शक्ती देवो”, असं शाह म्हणाले.
न्यायमूर्ती शाह भावुक!
दरम्यान, आपल्या शेवटच्या भाषणात बोलताना न्यायमूर्ती शाह भावुक झाल्याचं लाईव्ह लॉनं दिलेल्या बातमीत नमूद करण्यात आलं आहे. यावेळी न्यायमूर्तींनी राज कपूर यांच्या चित्रपटातील जीना यहाँ, मरना यहाँ गाण्यातील काही ओळी नमूद केल्या. “कल खेल में, हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा”, असं शाह म्हणाले.
न्यायमूर्ती शाह यांची दिलगिरी!
दरम्यान, न्यायमूर्ती शाह यांनी यावेळी बोलताना दिलगिरीही व्यक्त केली. “माझ्या कार्यकाळात जर मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यासाठी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून ते जाणूनबुजून झालेलं नाही. मी नेहमीच माझ्या कामाची पूजा केली आहे. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मला भरून आलं आहे. मी बार आणि रजिस्ट्रीच्या सर्व सदस्यांचा आभारी आहे. माझ्या सपोर्ट स्टाफ आणि माझ्या निवासस्थानावरील कर्मचारी वर्गाचाही मी आभारी आहे”, असंही न्यायमूर्ती शाह म्हणाले.