भारताच्या राजधानीत विषारी धुक्याचे साम्राज्य पसरल्याने त्यावर मात करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या मोठय़ा गाडय़ांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यास मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. तथापि, गुंतवणुकीवर परिणाम होणाऱ्या पर्यावरण कराविरुद्ध करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी मात्र न्यायालयाने पुढे ढकलली.
हरित गटाने डिझेलवरील छोटय़ा गाडय़ांच्या विक्रीवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. ज्या डिझेल गाडीच्या इंजिनाची क्षमता २००० सीसी इतकी आहे त्यावर बंदी घालण्याचा न्यायालय विचार करीत आहे. मात्र त्यासाठी प्रथम गाडय़ांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शहरातील सर्व डिझेल गाडय़ांवर स्वतंत्र हरित कर लावण्याबाबतचा आदेश न्यायालयाने देणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबतचा आदेश न्यायालयाने दिलेला नाही. या बाबत पुढील आठवडय़ात सुनावणी होणार आहे. हरित कर हा महिंद्र आणि महिंद्र, टाटा मोटर्स आणि टोयोटा मोटर कॉर्पोरेशन यांच्यासाठी जाचक ठरण्याची शक्यता आहे. दिल्ली हे जगातील सर्वाधिक दूषित शहर बनले असून तेथील नागरिकांना श्वसनाचे विकार सतावत आहेत. न्यायालयाने यावर व्यापक योजना असावी, असे गाडय़ांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील सार्वजनिक परिवहन सेवेमार्फत बसगाडय़ांची संख्या वाढविण्यात येऊन ती १० हजार करावी आणि त्या गाडय़ांचे योग्य प्रकारे परिरक्षण करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली सरकारला दिला. बसगाडय़ांच्या ताफ्यात वाढ करून ती पाच हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवावी, असा आदेश २७ जुलै १९९८ रोजी न्यायालयाने दिला होता.
चार नाक्यांवरून जड वाहनांना प्रवेश बंद
नवी दिल्ली : राजधानीतील हवेच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आणखी एक उपाययोजना आखण्याचे आदेश दिले. केवळ दिल्लीकडे जाणारी जड वाणिज्यिक वाहने वगळता अन्य जड वाहनांना चार विशिष्ट नाक्यांवरून प्रवेश करण्यास मनाई केली आहे. सदर आदेश देताना आम्ही अन्य कोणत्याही मुद्दय़ाचा विचार केलेला नाही, केवळ पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनच विचार केला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोन, १०, ५८ आणि राज्य महामार्ग ५७ या चार नाक्यांवरून दिल्लीकडे जाणारी जड वाहने वगळता अन्य जड वाहनांना प्रवेशास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे फरिदाबाद, पालवाल, गझियाबाद आणि बागपत येथून दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.