सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (८ नोव्हेंबर २०१६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण नोटबंदीचा निर्णय घेतल्याचं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. तसेच मला केवळ ५० दिवस द्या, ५० दिवसांत देश भ्रष्टाचारमुक्त झाला नाही, तर मला जिवंत जाळा, अशा आशयाचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याला आणि नोटबंदीच्या निर्णयाला आज बरोबर सात वर्षे पूर्ण झाली आहेत.
याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला आता गाडण्याची वेळ आली आहे, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर एका जुन्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत मोदींना लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा- “…तरीही निर्लज्जासारखं हसतायत”, सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया
“मला ५० दिवस द्या, मी चुकीचा निघालो, तर मला जाळून टाका” असा मथळा असलेल्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत प्रशांत भूषण आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “नोटाबंदीला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी (नरेंद्र मोदी) ५० दिवसांची मुदत मागितली होती. पण आता त्यांना आणि भाजपाला गाडण्याची वेळ आली आहे.”
प्रशांत भूषण यांनी अन्य एक पोस्ट करत भाजपा समर्थक कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. तसेच नोटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे निराश झालेल्या लोकांची मोदींनी कशी खिल्ली उडवली, हे कधीही विसरू नका, असा सल्लाही भूषण यांनी दिला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओही शेअर केला आहे. संबंधित पोस्टमध्ये प्रशांत भूषण म्हणाले, “नोटाबंदीमुळे लोकांना निराश करून मोदींनी त्यांची खिल्ली कशी उडवली, हे कधीही विसरू नका. तुम्हाला हे पण माहीत आहे, ८ तारखेला रात्री ८ वाजता अचानक ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्या. घरी लग्न आहे, पण पैसे नाहीत, अशी लोकांची स्थिती होती. मोदींचं हे वक्तव्य ऐकून भक्त (नरेंद्र मोदी समर्थक) हसत होते.”