CJI DY Chandrachud: भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका कार्यक्रमात बोलत असताना चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाष्य केले. “सर्वोच्च न्यायालयाने लोकांचे न्यायालय म्हणून आपली भूमिका भविष्यातही तशीच कायम ठेवली पाहीजे. पण याचा अर्थ त्यांनी संसदेतील विरोधी पक्षाची जागा घेऊ नये”, असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्यात आयोजित केलेल्या सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन (SCAORA) च्या पहिल्या परिषदेला ते संबोधित करत होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले, “मागच्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने न्यायदानाचा एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्शही आपण गमावता कामा नये. जेव्हा समाजाचा विकास आणि भरभराट होत असते, तेव्हा एक असा समज निर्माण होतो की, फक्त मोठ्या लोकांनाच न्याय मिळतो. पण आमचे न्यायालय असे नाही, ते लोक न्यायालय आहे आणि हीच भूमिका आपल्याला भविष्यातही जपली पाहिजे. तसेच लोकांचे न्यायालय असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा याचा अर्थ असा नाही की, आपण संसदेतील विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे.”

हे वाचा >> CJI Chandrachud : “सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची निवड करा”, डी. वाय. चंद्रचूड यांनी केली पत्र लिहून केली शिफारस

जेव्हा एखादा निर्णय कुणाच्या बाजूने लागतो तेव्हा सर्वोच्च न्यायालय ही एक अप्रतिम संस्था आहे, असे काही लोक मानतात. तर जेव्हा निर्णय विरोधात जातो, तेव्हा हेच लोक सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने शंख फुंकतात. मला वाटते की, आजच्या काळात ही अशी फूट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असेही डीवाय चंद्रचूड यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मला यात धोका दिसतो. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल काय येतो, यावरून तुम्ही न्यायालयाच्या भूमिकेकडे पाहू शकत नाही. वैयक्तिक खटल्यांचा निकाल एकतर तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात लागू शकतो. न्यायाधीशांना प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

हे ही वाचा >> बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञानाच्या आधारावर हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जसे की, खटल्यांसाठी ई-फायलिंग, केस रेकॉर्ड्सचे डिजिटायझेशन, खंडपीठाच्या सुनावणीदरम्यान होणाऱ्या युक्तीवादाचे स्पीच टू टेक्स्ट तंत्रज्ञान वापरून मजकूरात रूपांतर करणे आणि न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करणे, अशा काही गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला. तसेच थेट प्रक्षेपणाचे काही तोटे असले तरी न्यायव्यवस्थेसाठी हे परिवर्तनकारी ठरले आहे, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.