सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी तुलना करणारे तमिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. उदयनिधी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकार, द्रमुख खासदार ए. राजा. सीबीआय आणि इतर काही लोकांना नोटीस बजावली आहे. उदयनिधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने या नोटिसा पाठवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बी. जगन्नाथ यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना या नोटिसा बजावल्या आहेत. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी उदयनिधींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बी. जगन्नाथ यांनी याचिकेद्वारे केली होती.

सर्वोच्च न्याालयाने नोटीस बजावली असली तरी त्यामध्ये उदयनिधींच्या वक्तव्याला चिथावणीखोर वक्तव्य म्हटलेलं नाही. स्टॅलिन यांच्याविरोधातील याचिंकांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने या नोटिसा बजावल्या आहेत. उदयनिधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. सनातन धर्माबाबत उदयनिधींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपासह देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार टीका केली होती. तसेच त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.

हे ही वाचा >> “मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही”, रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

तमिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे २ सप्टेंबर रोजी चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करत होते. भाषणादरम्यान, उदयनिधी यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू आणि करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिकाही मांडली. उदयनिधी म्हणाले, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court notice to udhayanidhi stalin over sanatana dharma remarks asc
Show comments