नवी दिल्ली : एखादी कविता किंवा विंडबन किंवा कोणत्याही कलाप्रकारामुळे दोन समुदायांमध्ये द्वेषभावना किंवा वैर वाढावे, इतका आपल्या प्रजासत्ताकाचा पाया डळमळीत नाही, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कलात्मक अभिव्यक्तीच्या विरोधात होत असलेल्या कायद्याच्या गैरवापराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून प्रसारित केलेल्या कवितावाचनाच्या चित्रफितीच्या आधारे त्यांच्यावर गुजरात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. उज्जल भुयान यांनी रद्द ठरवला. ‘हा कायदेशीर प्रक्रियेचा स्पष्टपणे गैरवापर आहे’ अशा शब्दांत खंडपीठाने गुजरात पोलिसांवर ताशेरे ओढले.
‘एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांची वैचारिक अभिव्यक्ती हा सुदृढ आणि सुसंस्कृत समाजाचा अविभाज्य घटक आहे. घटनेच्या अनुच्छेद २१ने दिलेली सन्माननीय जीवन जगण्याची हमी, वैचारिक वा मतस्वातंत्र्याविना अशक्य आहे,’ असे खंडपीठाने ५४ पानी निकालपत्रात नमूद केले.
एखाद्या मोठ्या समूहाला दुसऱ्याची मते पटत नसली तरी, त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती अधिकाराचा आदर राखायलाच हवा, असे खंडपीठाने म्हटले. ज्यांच्यात नेहमी असुरक्षिततेची भावना असते, तसेच टीका झाल्यावर आपली ताकद किंवा पदाला धोका आहे असे जे मानतात, त्यांच्या दृष्टिकोनातून लिखित किंवा मौखिक शब्दांच्या प्रभावाचे आकलन करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
प्रकरण काय?
प्रतापगढी यांनी ‘एक्स’वरून प्रसारित केलेल्या चित्रफितीत पार्श्वभागी वाजत असलेल्या गाण्यातील शब्द प्रक्षोभक तसेच राष्ट्रीय एकता आणि धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे आरोप करत ३ जानेवारी रोजी गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
कामराला अंतरिम जामीन
चेन्नई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी हास्यकलाकार कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यान,न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी खार पोलिसांनाही नोटीसही बजावली असून या प्रकरणावरील सुनावणी ७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.