फाशीची शिक्षा टाळण्यासाठी मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमनकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेले सर्व प्रयत्न बुधवारी अपयशी ठरले. याकुब मेमनने निर्णय सुधार याचिकेसंदर्भात आणि डेथ वॉरंटविरोधात केलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने फेटाळल्या. यामुळे याकुब मेमनच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. याकुबने राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्जही फेटाळण्यात आला असून, त्याला गुरुवारी (३० जुलै) त्याच्या जन्मदिनी सकाळी सात वाजता नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली जाणार आहे. फाशी देण्यासाठीची सर्व प्रक्रिया नागपूर कारागृहात पूर्ण करण्यात आली आहे. कारागृहाबाहेर प्रचंड पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
याकुब मेमनच्या निर्णय सुधार याचिकेच्या (क्युरिटिव्ह पीटिशन) निकालामध्ये कसलीही त्रुटी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. निर्णय सुधार याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्याची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईतील न्यायालयाने काढलेले डेथ वॉरंटही योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. पी. सी. पंत आणि न्या. अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने याकुब मेमनच्या वकिलांनी केलेली मागणी फेटाळून लावली. निर्णय सुधार याचिकेचा निकाल देताना न्यायालयीन प्रक्रियेचा योग्य पद्धतीने वापर केला गेल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
फाशीच्या शिक्षेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी याकुबकडून गेल्या दोन आठवड्यांपासून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यपालांकडेही त्याने दयेचा अर्ज गेल्याच आठवड्यात दाखल केला. तोही बुधवारी फेटाळण्यात आला. याकुबला सुनावण्यात आलेल्या फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात केलेली फेरविचार याचिका एप्रिलमध्ये तीन सदस्यीय पीठाने फेटाळली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा त्याने सर्वोच्च न्यायालयात निर्णय सुधार याचिका (क्युरिटिव्ह पिटिशन) दाखल केली होती. त्यावरही २१ जुलैला निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने त्याची याचिका फेटाळली होती. या याचिकेची फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी याकुबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, या निकालामध्ये कोणतीही त्रुटी नसून, न्यायालयीन पद्धतीचा योग्य वापर करण्यात आला असल्याचे तीन सदस्यीय खंडपीठाने स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा