मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब अब्दुल रझाक मेमन याची दुरुस्ती याचिका (क्युरेटिव्ह पीटिशन) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे त्याला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला असून ३० जुलैस या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सध्या याकूब मेमन हा नागपूरच्या तुरुंगात आहे.
मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी याकूबने दाऊद इब्राहिमला मदत केली होती. १९९६पासून मला दुभंग व्यक्तिमत्त्वाचा रोग जडला असून २० वर्षे मी तुरुंगात आहे. त्यामुळे जन्मठेप आणि फाशी या दोन शिक्षा एकाच वेळी देता येत नसल्याने माझी फाशी रद्द करावी, असे याकूबच्या वतीने याचिकेत म्हटले होते. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले आहे, की याकूबने उपस्थित केलेले मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये दुरुस्ती याचिकेच्या निर्णयाबाबत घालून दिलेल्या तत्त्वात येत नाहीत.
२१ मार्च २०१३ रोजी मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर या शिक्षेच्या फेरविचाराची मागणी करण्यासाठी त्याने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने ९ एप्रिल १९१५ला फेटाळली होती. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही मे २०१४मध्ये त्याच्यावतीने केलेला दयेचा अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात २३ जणांना जन्मठेप ठोठावली असून त्यात याकूबचा भाऊ इसा, वहिनी रुबिना यांचा समावेश आहे. याकूब हा फरारी होता आणि काठमांडूहून दिल्ली विमानतळावर ६ ऑगस्ट १९९४ रोजी येताच त्याला अटक करण्यात आली होती. आपण शरण येण्यासाठीच मायदेशी परतल्याचा दावा त्याने केला होता. याकूबचा मोठा भाऊ टायगर मेमन आणि या कटातील अन्य काही गुन्हेगारांनी पाकिस्तानात आश्रय घेतल्याचा संशय आहे.
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या १३ बॉम्बस्फोटात ३५० लोक ठार तर इतर १२०० जण जखमी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा