काही दिवसांपूर्वी शिवसेनेची ( ठाकरे गट ) संपत्ती एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच, याचिकाकर्त्यांला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. ‘याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?’, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.
‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यनेते बनले होते. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावा, अशी याचिका वकील आशिष गिरी यांनी १० एप्रिल २०२३ ला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
यावर आज ( २८ एप्रिल ) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आशिष गिरी यांना खडसावलं आहे. “ही याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?”, असा प्रश्न उपस्थित करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिका फेटाळली आहे.
याचिका दाखल केल्यावर आशिष गिरी यांनी सांगितलं होतं की, “सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना पक्षाचं अध्यक्ष म्हणून कायम ठेवलं, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा.”
हेही वाचा : अब्दुल सत्तारांच्या ‘छाती फाडण्या’च्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे,” असे गिरी म्हणाले होते.