मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी शिक्षा झालेल्या तीन आरोपींनी शरणागतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. आपली शिक्षा माफ करण्यासाठी राष्ट्रपतींकडे केलेली याचिका प्रलंबित असल्याने तिच्यावर सुनावणी होईपर्यंत शरणागती पत्कारण्यास मुदतवाढ द्यावी, अशी या आरोपींची मागणी होती.
झैबुन्निसा अन्वर काझी (७०), इसाक मोहम्मद हाजवाने (७६) आणि शरीफ अब्दुल गफूर पारकर ऊर्फ दादाभाई (८०) या तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात शिक्षा सुनावली होती. तसेच त्यांना तुरुंगाधिकाऱ्यांना शरण येण्यासाठी मुदतही दिली होती. मात्र, आपली शिक्षा माफ करण्यासाठी राष्ट्रपतींकडे अर्ज केला असून त्यांच्याकडून निर्णय होईपर्यंत शरणागतीची मुदत वाढवावी, अशी या तिघांची मागणी होती. मात्र, राष्ट्रपतींकडे दयायाचिका केली आहे, हा शरणागतीची मुदत वाढवण्यासाठीचा आधार होऊ शकत नाही, असे सांगत सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांनी या याचिका फेटाळून लावल्या.
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी २१ मार्च रोजी निकाल सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने झैबुन्निसा काझी हिला पाच वर्षांचा कारवास सुनावला होता. तर हाजवाने याला टाडा न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा वाढवून सर्वोच्च न्यायालयाने त्याला जन्मठेप ठोठावली आहे. हाजवाने याने आधीच पाच वर्षांचा कारावास भोगला आहे. पारकर याची जन्मठेप सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. त्यापैकी पारकर याने १४ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे. या तिघांची शिक्षा माफ करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केली होती.
संजय दत्तच्या याचिकेवर
आज निर्णय
बॉम्बस्फोटांप्रकरणी झालेली शिक्षा भोगण्यासाठी शरण येण्याकरिता दिलेली मुदत सहा महिन्यांनी वाढवून द्यावी, या अभिनेता संजय दत्त याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत संजय दत्तला शिक्षा ठोठावण्यात आली असून त्याला साडेतीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. मात्र, ही शिक्षा भोगण्यासाठी आपल्याला सहा महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी संजयने न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे. ही याचिका न्या. पी. सदाशिवम आणि न्या. बी. एस. चौहान यांनी मंगळवारी दाखल करून घेतली. त्यावर बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
पाच आरोपींच्या फेरआढावा याचिका फेटाळल्या
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील पाच आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फेरआढावा घ्यावा यासाठी केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या. गुणवत्तेच्या आधारावर झैबुन्निसा अन्वर काझी, केरसी अदाजानिया, युसुफ खान, रणजितकुमार सिंग आणि अल्ताफ अली सय्यद यांच्या याचिका टिकत नसल्याचे कारण न्यायालयाने दिले.
शरणागतीस मुदतवाढ देण्यास नकार
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी शिक्षा झालेल्या तीन आरोपींनी शरणागतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. आपली शिक्षा माफ करण्यासाठी राष्ट्रपतींकडे केलेली याचिका प्रलंबित असल्याने तिच्यावर सुनावणी होईपर्यंत शरणागती पत्कारण्यास मुदतवाढ द्यावी, अशी या आरोपींची मागणी होती.
First published on: 17-04-2013 at 03:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court rejects the plea on surrender