तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात वक्तव्य करणाऱ्या स्टॅलिन यांनी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने त्यांना परखड शब्दांत सुनावलं आहे. ‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा करताय?’ असा सवाल न्यायालयानं उदयनिधी स्टॅलिन यांना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांच्यावरील आरोपांना विरोध करणारी आणि कारवाईपासून संरक्षणासाठी दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्टॅलिन यांना परखड शब्दांत फटकारलं आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल, असं न्यायालयाने यावेळी जाहीर केलं.

काय म्हटलंय न्यायालयाने?

“तुम्ही राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) अंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यांचा अवमान केला. आता तुम्ही कलम ३२ नुसार तुम्हाला मिळालेल्या दाद मागण्याच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करता? तुम्ही जे काही म्हणालात, त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती नव्हतं का? तुम्ही कुणी सामान्य व्यक्ती नाही आहात. तुम्ही एक मंत्री आहात. तुम्हाला अशा गोष्टींच्या परिणामांची कल्पना असायला हवी”, अशा शब्दांत न्यायालयाने स्टॅलिन यांची कानउघाडणी केली.

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, सनातन धर्माचा अवमान करणं भोवणार?

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी संबंधित विधान केलं होतं. तसेच, नंतर त्यांना अनेक प्रसंगी विचारणा केली असता आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचंही उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केलं होतं. “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं”, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court slams udayanidhi stalin on sanatan dharma remarks row pmw
Show comments