जयपूर साहित्य महोत्सवातील कथित दलितविरोधी वक्तव्यांवर टीका करीत समज देतानाच सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्येष्ठ विचारवंत आशीष नंदी यांना अटक करण्यासही मनाई केली.
तुमचा हेतू काहीही असो अशी विधाने करणे चुकीचेच आहे. वाटेल ती विधाने करण्याचा परवाना तुम्हाला मिळालेला नाही, हे तुमच्या अशीलाला सांगा, असे सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बजावले. या खंडपीठात न्या. ए. आर. दवे आणि न्या. विक्रमजीत सेन यांचा समावेश होता. ७६ वर्षीय नंदी यांच्यावतीने अ‍ॅड. अमन लेखी यांनी युक्तिवाद केला.
खंडपीठाने बजावले की, वक्तव्ये ही जबाबदारीने केली पाहिजेत. तुमचा जर तसा हेतू नव्हता तर लोकांचा गैरसमज होईल, अशी वक्तव्ये मुळात तुम्ही केलीतच का, असा सवालही खंडपीठाने केला. कोणी एखादा विचार मांडला तर त्याला कायदा दंडनीय मानतो का, असा सवाल नंदी यांच्यावतीने उपस्थित करण्यात आला होता. मात्र खंडपीठाने सांगितले की, आम्हीही या विधानांबाबत समाधानी नाही. नंदी यांनी अधिक काळजीने बोलायला हवे होते.
आपल्याविरुद्ध दाखल झालेली प्राथमिक तक्रार रद्द करावी, अशी मागणी नंदी यांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राजस्थान सरकारला बाजू मांडण्यास फर्माविले आहे. तोवर नंदी यांना अटक केली जाऊ नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. नंदी यांच्या विरोधात रायपूर, नाशिक आणि पाटण्यातही तक्रारी दाखल झाल्याने छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि बिहार सरकारलाही बाजू मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.नंदी यांच्या याचिकेला दलित समाजातील एका वकिलाने विरोध केला आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. मात्र आपण रीतसर याचिका करा, असे खंडपीठाने त्यांना सांगितले.

Story img Loader